सरपंच पद टिकणार की जाणार हे ठरणार लोणंद / वार्ताहर : शिरवळ, ता. खंडाळा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी सागर पानसरे यांच्या बाबतच्या अ...
सरपंच पद टिकणार की जाणार हे ठरणार
लोणंद / वार्ताहर : शिरवळ, ता. खंडाळा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी सागर पानसरे यांच्या बाबतच्या अविश्वास ठरावाबाबत विशेष ग्रामसभा तहसीलदार दशरथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दि. 18 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. कायद्यानुसार तीन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव आणता येत नव्हता. त्यामुळे आज या अविश्वास ठरावाच्या अंतिम निर्णयाच्या परीक्षेस एका ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचांना समोरे जावे लागत असल्याने सातारा जिल्ह्याच्या इतिहासात या विशेष ग्रामसभेकडे सर्वांचेच डोळे लागलेले आहेत. ही ग्रामसभा सकाळी ठीक 10 वाजता ज्ञान संवर्धिनी विद्यालय या ठिकाणी घेण्यात येणार असून सर्व ग्रामपंचायत सदस्य व शिरवळ येथील मतदार यांनी वेळेवर उपस्थित राहण्याची विनंती तहसीलदार दशरथ काळे यांनी केली आहे.
गेली काही महिन्यांपासून सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यावर त्या मनमानी कारभार करत असल्याचा ठपका लावण्यात आला होता. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला असून त्या अंतिम निर्णयाबाबत या विशेष ग्रामसभेतून किती शिरवळकर हे अविश्वास ठरावाच्या बाजूने आणि ठरावाच्या विरोधात आहेत हे पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीने तर सरपंचांच्या विरोधात चांगलाच शड्डू ठोकला आहे. सरपंचाच्या कामगिरीचा पर्दाफाश पत्रिका काढून विविध मुद्दे मांडत जनतेसमोर आणला आहे. तसेच सरपंच यांच्या समर्थनार्थ ही मोहीम राबली जाते आहे.
ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत किती विकासकामे सरपंचांच्याकडून करण्यात आली. याबाबत ही पत्राच्या माध्यमातून ठरावाच्या विरोधात असलेल्या सरपंच समर्थकांकडून जनतेशी संवाद साधण्यात आला आहे.
शिरवळ सरपंचांना उच्च न्यायालयाचा दणका...
शिरवळ सरपंचांविरुध्द अविश्वास प्रस्तावाची विशेष ग्रामसभा (मतदान) तहसीलदार यांच्या उपस्थित होणार आहे. अविश्वास प्रस्तावाविरोधात सरपंचांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. विशेष ग्रामसभा (मतदान) प्रक्रियेवर स्थगिती मागण्यात आली होती. परंतू उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून शिरवळ परिसरात विविध चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. महाविकास आघाडीकडून ऍड. प्रदिप गोळे, ऍड. अजित केंजळे व सरकारी वकील श्रीमती बने यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरण्यात आला आहे.
आजचा आठवडी बाजार बंद
आजच्या होणार्या शिरवळ सरपंचांबाबत अविश्वास प्रस्तावाची विशेष ग्रामसभा (मतदान) विशेष ग्रामसभेमुळे शिरवळचा आठवडी बाजार तसेच दैनंदिन भाजी मंडई बंद राहणार आहे. तहसीलदार दशरथ काळे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
....................