अहमदनगर / प्रतिनिधीः श्रीगोंदे तालुक्यातील चिंभळा गावात रविवारी पहाटे दरोडा पडला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला जखमी झाली. महिलेच्या काना...
अहमदनगर / प्रतिनिधीः श्रीगोंदे तालुक्यातील चिंभळा गावात रविवारी पहाटे दरोडा पडला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला जखमी झाली. महिलेच्या कानातील दागिने खेचल्याने त्यांच्या दोन्ही कानांच्या पाळ्या तुटल्या.
दरोडेखोरांनी विमल जाधव या ज्येष्ठ महिलेच्या घरातील 50 हजारांचा ऐवज चोरला. त्यांच्या कानातील दागिने खेचल्याने दोन्ही कानाच्या पाळ्या तुटल्या. जाधव यात जखमी झाल्या आहेत. चिंभळा गावापासून काही अतंरावर असलेल्या जाधव यांच्या वस्तीवर रविवारी पहाटे दरोडेखोर आले. घरात महादेव जाधव व विमल जाधव हे ज्येष्ठ दामप्त्य होते. सुरुवातीला दरोडेखोरांनी घराची कडी वाजविली. प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा उघडण्यासाठी धमकावले. शेवटी दरवाजा उघडला गेला. दरोडेखोरांनी आत येताच विमल जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावू लागले. विमल यांनी कानातील दागिने काढून देण्यास विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी कानातील दागिने पकडून जोरात हिसकावले. त्यामुळे जाधव यांच्या कानाच्या दोन्ही पाळ्या तुटल्या. दरोडेखोरांनी कानातील आणि गळ्यातील दागिनेही हिसकावून नेले. सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. जखमी जाधव यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.