पाथर्डी/प्रतिनिधी ः पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी ठेकेदार आणि उपअभियंत्य...
पाथर्डी/प्रतिनिधी ः पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी ठेकेदार आणि उपअभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेकडून तहसीलदाराच्या दालनात ठिय्या आंदोलन करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
या राष्ट्रीय महामार्गावर मेहकरी ते पाथर्डी ( टाकळी फाटा ) काम अतिशय मंद गतीने चालू आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले असून, वाहनधारकांना समजण्यासाठी दिशादर्शक फलक नाहीत. वाहनधारकांच्या सुरक्षेची कुठल्याही प्रकारची काळजी घेण्यात आली नाही. रस्त्यावरील खड्डे चुकवताना व खड्ड्यात आदळून आतापर्यंत अनेक निष्पाप प्रवासी व वाहधारकांचा बळी गेला. कालही याच महामार्गावर दोन अपघात होऊन चार प्रवाशांचा बळी घेतला गेला. या सर्वांच्या मृत्यूस महामार्गाचे ठेकेदार कंपनी मे. ईंगावले कन्स्ट्रक्शन कंपनी व या महामार्गावरील कामाचे देखभालीसाठी नियुक्ती असलेले महामार्ग उपअभियंता दि.ना.तारडे यांना जबाबदार ठरवून त्यांचेवर कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांचे दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना संतोष जिरेसाळ यांनी सांगितले की या महामार्गाचे सदोष कामावर वाहनधारकांना किमान सुविधा देण्याबाबत ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केले आहे. तहसीलदार यांच्या दालनात 21 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या मिटींग मध्ये उपअभियंता दि.ना.तारडे यांनी तातडीने या महामार्गाचे कामात सुधारणा करण्याचे आश्वासन देऊनही त्यांनी आश्वासन पाळले नाही. महामार्ग प्रशासन व ठेकेदार यांच्या भ्रष्टाचारी व निर्लज्ज कारभारामुळे या राष्ट्रीय महामृत्युमार्गाने आजपर्यंत सुमारे 345 निरापराध बळी घेतले आहेत. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांच्या वतीने यावेळी करण्यात आली. पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांनाही या संदर्भात स्वतंत्रपणे निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष एकनाथ सानप, विभाग अध्यक्ष बाबा सांगळे, शहर सचिव संदीप काकडे, शहर उपाध्यक्ष राजु गिरी, संजय चौनापुरे, सामाजिक कार्यकर्ते कौतुक चिंतामणी आदींनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
---------------------