राजकारण हे मृगजळ आहे आणि नाते हे वास्तव आहे, याची जाणीव ठेवणारेच जीवनात यशस्वी होत असतात. एकाच कुटुंबातील मुलगा एका पक्षात, मुलगी दुसर्याच ...
राजकारण हे मृगजळ आहे आणि नाते हे वास्तव आहे, याची जाणीव ठेवणारेच जीवनात यशस्वी होत असतात. एकाच कुटुंबातील मुलगा एका पक्षात, मुलगी दुसर्याच पक्षात आणि स्वतः तिसर्याच पक्षात अशी उदाहरणे काही नवीन नाहीत. उंबरठ्याबाहेर पडले, की राजकारण आणि घरात आले की नातेसंबंध याचा विसर पडू न देणार्यांचेच राजकारणातील अस्तित्त्व टिकते. विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे, पंकजा मुंडे-धनंजय मुंडे अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. शरद पवार यांनी राजकारणापलीकडे मैत्री जपली आहे. त्यांचे भाऊ आप्पासाहेब हे ही काँग्रेसच्या विचाराचे नव्हते, तरीही त्यांच्या कुटुंबात कधीच कलह झाला नाही. एवढेच कशाला पवार एका पक्षात, त्यांचे मेहुणे दुसर्याच पक्षात, अजित पवारांचे आजोळ तिसर्याच पक्षात आणि सासुरवाडीचे लोक वेगळ्याच पक्षाच असे चित्र असले, तरी कौटुंबिक दुरावा कधीच आला नाही. धुळे-नंदुरबारमध्ये पती एका पक्षात, तर पत्नी दुसर्याच पक्षात असे प्रकार घडले आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर सून भाजपत आहे. असे असले, तरी राजकारण आणि कुुटुंबाच्या मर्यादा पाळल्या, की फारशा अडचणी येत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवार यांनी त्यांना मदत केलीच होती. मोदी यांनीही राजकारण वेगळे आणि मित्रत्व वेगळे हे सांगताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मला त्यांच्या पसंतीचे कुर्ते आणि मिठाई आवर्जून पाठवत असत,’ असे सांगितले. एरव्ही हेच मोदी पश्चिम बंगालमध्ये गेले, की भाजपचा प्रचार करताना दीदींवर शत्रूसारखे तुटून पडायचे. पवार यांचेही असेच. त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली, त्यातील नेत्यांवर नाही. पवार यांच्या मेहुण्यांनी तर कोपरगावच्या एका सभेत पवार यांच्यावर नाव घेऊन घणाघाती टीका केली, त्याला पवार यांनी कधीच उत्तर दिले नाही. कुटुंब आणि राजकारणात असा ताळमेळ घालावा लागतो. विरोधकांवर कडवी टीका करणार्या पंतप्रधानांनी वैयक्तिक आयुष्यात आपले अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्रीही नव्हते, तेव्हा काही कामासाठी संसदेत आले होते. त्या वेळी त्यांना गुलाम नबी आझाद भेटले. त्यांच्याशी खूप छान गप्पा झाल्या. ते दोघे जेव्हा बाहेर आलो, तेव्हा पत्रकारांनी मोदी यांना विचारले, की संघाची पार्श्वभूमी असतानाही तुम्ही गुलाम नबी आझादांशी मैत्री कशी ठेवू शकता? त्या वेळी गुलाम नबी आझादांनी फार सुंदर उत्तर दिले होते. तुम्हाला बाहेरून जसे चित्र दिसते तसे नाही. आम्ही वेगवेगळ्या पक्षातील लोक एखाद्या कुटुंबाप्रमाणे कसे जोडलेले असतो, त्याची कल्पना बाहेरून येणार नाही, असे गुलाम नबी आझादांनी म्हटले होते.
आताच्या काळात विरोधकांना कायम शत्रू मानून सातत्याने तसे वागणार्यांमुळे राजकारण दूषित झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडली. 11 आजी-माजी आमदार भाजपत गेले. त्याला शह म्हणून ममतादीदींनी भाजपच्या खासदाराच्या पत्नीला तृणमूलमध्ये आणले. त्याने खरेतर इतका गहजब व्हायचे काहीच कारण नाही. दोन वेगवेगळ्या पक्षात पती-पत्नी असले, म्हणजे संसाराची राखरांगोळी केलीच पाहिजे, असे नाही. त्यातही तिहेरी तलाकविरोधी कायदा करण्यात ज्या पक्षाचा मोठा वाटा आहे, त्याच पक्षाच्या खासदाराने पत्नी दुसर्या पक्षात गेल्यामुळे तिला तलाक देण्याची नोटीस पाठवावी, हा कहरच झाला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच आता सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी; परंतु ते तशी घेणार नाहीत. भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता यांनी भाजपला रामराम करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर खासदार सौमित्र खान यांनी पत्नीला घटस्फोट देण्याची तयारी केली. मी दलित समाजातील एक महिला आहे. भाजप आणि पतीसाठी लढा दिला. आम्हाला उमेदवारी मिळाली आणि लोकसभा निवडणुकीत विजय झाला; पण आता भाजपामध्ये फक्त संधीसाधूंना स्थान देण्यात येत आहे, असा आरोप सुजाता मंडल यांनी केला. इतके दिवस भाजपत राहून आता त्यांना भाजप चुकीचा वाटत असेल, तर त्यांना पक्ष सोडण्याचा अधिकार आहे; परंतु याचा अर्थ लगेच त्यांना खान यांनी नोटीस द्यावी. आम्हाला दोन वरून 18 जागा मिळतील, याची आम्हाला पुसटशी कल्पना नसतानाही आम्ही पक्षासाठी काम करत होतो. कोणतीही सुरक्षा नव्हती आणि कोणतंही पाठबळ नव्हते. आम्ही जनतेच्या पाठिंब्याने लढलो आणि जिंकलो. अजूनही आपण ही लढाई लढत आहोत असे वाटते; पण भाजपमध्ये आता आपल्याला कुठलेही स्थान आणि सन्मान दिला जात नव्हता, असे सुजाता मंडल म्हणाल्या. मराठीत एक नाटक होते. राजकारण गेलं चुलीत असे त्यांचे नाव. त्याचा अर्थ राजकारण कसे घरापर्यंत पोचले, असा होता. इथे मात्र खरेच राजकारण गेले चुलीत असे म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपकडे गुजराती पावडर आहे. तिने कलंकित नेत्यांना लगेच स्वच्छ करून पावन केले जाते. सुजाता यांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवून कलंकित नेत्यांना स्वच्छ करण्यासाठी कोणत्या प्रकारचा साबण वापरला जातो हे अजून समजलेले नाही, असे म्हटले आहे. आपल्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस असेल, असा विचार करून आम्ही भाजपसाठी लढा दिला. आता आम्ही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात लढा देऊ, असे सांगत मडल यांनी सुवेंदु अधिकारी यांच्या भाजप प्रवेशावर टीका केली.
सुजता मंडल यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे पती आणि भाजप खासदार सौमित्र खान नाराज झाले आहेत. त्यांनी पत्नी सुजाता मंडल यांना घटस्फोटाची नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. यासह सुजाता यांच्या घराच्या सुरक्षेत तैनात जवानांनाही हटवण्यात आले आहे. सौमित्र खान आणि सुजाता यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता, असे सांगितले जाते. पडद्यामागील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. कुटुंबात मतभेद होते हे खरे आहे. आम्ही कुटुंब आहोत, भांडण होऊ शकते; पण त्याला राजकीय स्वरुप देणे योग्य नाही. मी भाजपमध्ये दाखल झाल्याने पत्नीला नोकरी गमवावी लागली याबद्दल मला वाईट वाटते; पण आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी सुजाता यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणे खेदजनक आहे, असे खान म्हणाले. घटस्फोटाच्या नोटिशीवर जेव्हा राजकारण तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ते नात्यांसाठी वाईट बनते. सौमित्र हे भाजपच्या वाईट लोकांच्या सहवासात आहेत. हे लोक माझ्याविरूद्ध भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. तिहेरी तलाक संपविणारा पक्ष सौमित्राला आज मला घटस्फोट देण्यास सांगत आहे. निवडणुकीची लढाई घरापर्यंत आली. त्याअगोदर खान यांनी सुजाताशी सर्व संबंध संपवत आहे. खान आडनाव न वापरण्याची मी त्यांना विनंती करतो, असे ते म्हणाले. पत्नीने भाजप सोडल्याचे त्यांच्या किती मनाला लागले आहे, हे यातून दिसते. सौमित्र खान हे विष्णूपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. 2014 मध्ये ते तृणमूल काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढले आणि जिंकले. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या वतीने निवडणूक लढविली आणि जिंकले. सध्या ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही आहेत.