इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहरवासीयांची घरपट्टी कमी करण्यास आम्ही सक्षम आहोत. मात्र, पालकमंत्र्यांनी आपल्या शहरासाठी शासनाकडून विश...
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहरवासीयांची घरपट्टी कमी करण्यास आम्ही सक्षम आहोत. मात्र, पालकमंत्र्यांनी आपल्या शहरासाठी शासनाकडून विशेष बाब म्हणून संपूर्ण घरपट्टी माफ करून आणावी. शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या विकास कामांना अडचणी आणण्यापेक्षा त्यांनी वर्षभरात शहरासाठी किती निधी आणला हेही शहरवासियांना सांगावे, असे आव्हान नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ना. जयंत पाटील यांना दिले.
पाटील म्हणाले, भाजी मार्केटची इमारत उभारणीचे श्रेय आम्हाला मिळू नये यासाठी राष्ट्रवादीकडून याला विरोध होत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. भाजी मार्केट इमारत उभारण्याचा ठराव राष्ट्रवादीने यापूर्वी केला होता. ना. जयंत पाटील हे अर्थमंत्री असतानाही त्यांना या इमारतीसाठी निधी आणता आला नव्हता. आमच्या कार्यकाळात याला मंजूरी मिळवून पहिल्या टप्प्यातील निधी आणला आहे. तरी हे काम सुरु करण्यास राष्ट्रवादीकडून विरोध होत आहे. त्यांनी विकास कामात तरी राजकारण आणू नये.
ते म्हणाले, घरपट्टी कमी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत. मात्र, धोरणामुळे विशेष बाब म्हणून संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचे अधिकार पालिकेला नव्हे तर राज्य शासनाला आहेत. मंत्री महोदयांनी आपले वजन वापरून ही घरपट्टी माफ करावी. वर्षभरात त्यांनी शहराच्या विकासासाठी एक रुपयाचा निधी तरी आणला का? हेही त्यांनी जाहीर करावे. भाजप सरकारने दिलेला साडेनऊ कोटीचा निधीही या सरकारने परत नेला आहे. विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यावेळी उपस्थित होते.
..................