मराठा आंदोलक आक्रमक, सीएसटी परिसरात ठिय्या मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला आरक...
मराठा आंदोलक आक्रमक, सीएसटी परिसरात ठिय्या
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर आंदोलकांच्या एका गटाने विधानसभेकडे कूच केली असता पोलिसांनी त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठा आंदोलकांनी आंदोलनाचं हत्यार उपसून राज्य सरकारला जागं करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुणे, नाशिक, रायगड आणि मराठवाड्यातून मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. आंदोलकांनी आज सकाळपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं. मात्र, दुपारनंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले. या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केलं. या आंदोलनात तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले असून आंदोलनात महिला आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे. या आंदोलकांनी सीएसटी परिसरात रस्त्यावर बसूनच घोषणाबाजी सुरू केली. ‘या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय’, ‘ठाकरे सरकार हाय हाय’, अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. आंदोलकांनी ऐन रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केल्याने या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आंदोलकांची झटापट
सीएसटी परिसरात हे ठिय्या आंदोलन सुरू असतानाच आक्रमक आंदोलकांचा एक गट विधानभवनाच्या दिशेने निघाला आहे. त्यामुळे विधानभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव केल्याने आझाद मैदानासमोरच पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट उडाली. त्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याने या परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
चव्हाणांना हटवा, आंदोलकांची मागणी
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना आरक्षण समितीवरून हटविण्यात यावे, आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत नोकरभरतीला स्थगिती देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
सदाभाऊ खोत आझाद मैदानात; सभागृहात आवाज उठवणार
दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलक मराठा विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. 2185 पदांची नियुक्ती 2018 मध्ये पूर्ण झालेली आहे. न्यायालयाचा निर्णय नंतर आला, मात्र राज्य सरकारने जाणीवपूर्वक नियुक्ती दिली नाही. मराठा नेत्यांनी जाणीवपूर्वक मराठ्यांवर अन्याय केल्याचं खोत म्हणाले. शेतकऱ्यांच्या पोरांना रोजगार दिला असता तर काय झालं असतं? असा सवाल करतानाच सर्व मराठा नेते स्वत:ला राजे आणि सरदार मानतात, अशी टीकाही त्यांनी केली. उद्या सभागृहात मराठा आंदोलनावर आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
विधानपरिषदेत दरेकरांनी सरकारला धारेवर धरले
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारला धारेवर धरले. यावेळी दरेकर यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अधिवेशन वाढवण्याची मागणी केली. कामकाज सल्लागार समितीत आपणच विषय ठरवलेले आहेत. त्यामुळे दोन दिवस अधिवेशन वाढवण्याची मागणी करत दरेकर यांनी सभागृहात गोंधळ घातला.
कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून भाजप आमदारांनी विधानपरिषदेत जोरदार घोषणा केल्या. भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरू केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहिजे, सभापती महोदय न्याय द्या, अशा घोषणा देत विरोधकांनी वेलमध्ये गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज चालवणं कठिण झाल्याने अखेर पाच मिनिटासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
हा तर रडीचा डाव: मेटे
हे दोन दिवसांचे अधिवेशन आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा असताना या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषयच घेतला गेला नाही. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि या सरकारला आशीर्वाद देणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मराठा समजाला आरक्षणच द्यायचं नसल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला.