सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरानजीक सातारा-कोरेगांव मार्गावर संगममाहुली येथील कृष्णा-वेण्णा नद्यांच्या संगमावरील छत्रपती शाहू महाराज (थोर...
सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरानजीक सातारा-कोरेगांव मार्गावर संगममाहुली येथील कृष्णा-वेण्णा नद्यांच्या संगमावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या जीर्णोध्दार केलेल्या समाधीचे छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या 270 व्या पुण्यतिथीदिवशी थेट तेरावे वंशज राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवार, दि. 15 रोजी लोकार्पण करण्यात आले. समाधीच्या जीर्णोध्दारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झाल्याची प्रतिक्रिया राजमाता कल्पनाराजे यांनी यावेळी बोलताना दिली.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न त्यांचे नातू छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांनी पूर्ण केले. स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे सातारा येथील रंगमहालात 15 डिसेंबर 1749 रोजी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर संगममाहुली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचठिकाणी त्यांची समाधी उभारण्यात आली होती. या समाधीचा जीर्णोध्दार लोकसहभागातून करण्याचा संकल्प सातार्यातील इतिहासप्रेमींनी केला होता.
त्यानुसार या कामास ऑक्टोबर 2018 मध्ये सुरुवात झाली. मूळ समाधीस धक्का न लावता, आहे त्याचठिकाणी ताशीव आणि घडीव दगडांच्या साहाय्याने या समाधीचे काम हाती घेण्यात आले. या समाधीच्या काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या 270 व्या पुण्यतिथीदिवशी तिचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आज संगममाहुली येथे जीर्णोध्दारीत समाधी लोकार्पण सोहळा राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. यानिमित्त सातारा जिल्ह्यातील इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
यावेळी अजय जाधवराव, धिरेंद्र राजपुरोहित, अमर जाधवराव, शशिकांत पवार, अविनाश कोळपे, निरज झोरे, विलास माने, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, गीतांजली कदम तसेच सातार्यातील इतिहासप्रेमी उपस्थित होते. समाधीच्या जीर्णोध्दारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झाले असून, यामुळे सातारा परिसराच्या वैभवात भर पडल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी राजमातांनी नोंदविली.