कोल्हापूर / प्रतिनिधी : कोरोना महामारीत महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील रांगड्या मल्लांचा शड्डू थांबला. परंतू मानाच्या महाराष्ट्र केसरी क...
कोल्हापूर / प्रतिनिधी : कोरोना महामारीत महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील रांगड्या मल्लांचा शड्डू थांबला. परंतू मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्ताने शड्डू पुन्हा घुमवायला लागेल, अशी आशा आहे. ही स्पर्धा नेमकी कधी व कशी होणार याकडे पैलवान मंडळी व शौकीनांच्या नजरा लागल्या आहेत. कोरोनामुळे आयपीएलच्या धर्तीवर प्रेक्षक विरहीत स्पर्धा घेण्याचा विचार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद करत आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धा होतील, असे संकेत कुस्तीगिर परिषदेने दिले आहेत.
कोरोनामुळे सर्वच राष्ट्रीय व राज्य स्पर्धा बंद आहेत. विविध क्रीडा संघटना परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाची परवानगी राज्य शासन व भारतीय कुस्ती महासंघाकडे मागितली आहे. परंतू त्याला अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही. शासनाची परवानगी मिळताच स्पर्धा आयोजनासाठी परिषद सज्ज आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी राज्य भरातून शौकिन येतात. परंतू यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेता समूहाने एकत्र येणे शक्य नाही. तरी मोजक्या यंत्रणेसह पुण्यातील बालेवाडीच्या बंदिस्त क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार कुस्तीगिर परिषदेने केला आहे.
या स्पर्धेसाठी जवळपास 1000 कुस्तीपटू, 45 प्रशिक्षक, 45 संघ व्यवस्थापक, 50 पंच दाखल होत असतात. शासन नियमानुसार जवळपास 1200 लोकांच्या समूहाने देखील स्पर्धा घेण्यास मर्यादा येत असल्याने छोटे गट करून सामने खेळवण्याचा आराखडा आखला गेला आहे. दरवर्षी चार आखाड्यांवर होणारी स्पर्धा यंदा दोन आखाड्यावर खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा कालावधी 10 दिवसांचा असेल. मोजके निमंत्रित पाहूणे आणि पत्रकारांना फक्त स्पर्धेला उपस्थित राहता येईल.
पहिल्यांदा स्पर्धा प्रेक्षकांविना होणार असून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण फेसबुक पेज, युट्यूब, इन्स्ट्राग्रामद्वारे दाखवले जाणार आहे. सर्व स्पर्धेचे पुर्नप्रसारणही केले जाणार आहे. यासाठी परिषदेची वेबसाईट कार्यन्वित केली गेली आहे. स्पर्धकांच्या प्रवेशिकाही ऑनलाईन पध्दतीने स्विकारल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.