इस्लामपूर : तालुक्यात 106 शाळापैकी 101 शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांनी कोरोना बाबत काळजी घेतली आहे. 9 ते 12 वी पर्यंत 70 टक्के उपस्थिती आ...
इस्लामपूर : तालुक्यात 106 शाळापैकी 101 शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांनी कोरोना बाबत काळजी घेतली आहे. 9 ते 12 वी पर्यंत 70 टक्के उपस्थिती आहे. कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्या गावातील शाळा बंद करण्याचा निर्णय येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला.
सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजी पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या उपस्थितीत सभा झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्याने योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच शाळा सुरू होऊनही ग्रामीण भागात एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने एसटी सुरू कराव्यात, असा ठराव करण्यात आला. सातारा जिल्ह्यात आदर्श स्कूलसाठी तालुक्यातील सहा शाळा निवडण्यात आला आहेत. प्रायोगिक तत्त्वावर महामंडळ प्रत्येक गावात बस सुरु होण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे, असे सांगण्यात आले.
तालुक्यात आता फक्त कोरोनाचे 20 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याकडेला झालेले अतिक्रमण काढावे, विहिरीकडेला संरक्षण कठडे बांधावेत, अशी मागणी सदस्यांनी केली. जागतिक पातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह डीसले यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. ग्रामपंचायत, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन आदी विभागावर चर्चा झाली. गट नेते राहूल महाडिक, देवराज पाटील, आनंदराव पाटील, शंकरराव चव्हाण, रुपाली सपाटे, धनश्री माने, वसुधा दाभोळे आदींनी चर्चेत भाग घेतला.