करोडोंची माया नेमकी कुणासाठी? अहमदनगर/विशेष प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेला गेल्या वर्षीच शतक पूर्ण झाले. शतकपूर्ती सोहळा साजरा ...
करोडोंची माया नेमकी कुणासाठी?
अहमदनगर/विशेष प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेला गेल्या वर्षीच शतक पूर्ण झाले. शतकपूर्ती सोहळा साजरा होत असतांनाच, रयतने विविध निधींच्या नावाखाली, तसेच शिक्षक आणि प्राध्यापक भरतीसाठी करोडो रुपयांची माया गोळी केली. ही माया नेमकी कुणासाठी असा प्रश्न आता कर्मचार्यांकडून उपस्थित होत आहे.
रयतची स्थापना करण्यामागे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणाचा उदात्त हेतु होता. शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे, या धारणेतून अण्णांनी विविध ठिकाणी संस्था स्थापन केल्या. यातून बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी समाजकारण, राजकारण, अर्थकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीने रयतचे नाव उंचावले आहे. मात्र या संस्थेचा शतकपूर्ती सोहळा साजरा होत असतांनाच, या संस्थेच्या भ्रष्टाचाराचे बिंग फुटले. संस्थेत चाललेला नोकरभरती आणि इतर भ्रष्टाचार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.मात्र ही करोडो रुपयांची माया नेमकी कुणासाठी जमविली जाते याबाबत आता संस्थेने बोलते होण्याची गरज आहे.
सन 2009-10 या शैक्षणिक वर्षात संस्थेला कर्मचार्यांकडून 1 कोटी 39 लक्ष 71 हजार 205 रुपये कृतज्ञतानिधी प्राप्त झाला. तो रयत सेवक बँक, शाखा सातारा येथे संचित ठेवला होता. तर 2009-10 चा 1 कोटी 17 लक्ष 26 हजार 881 इतकी रक्कम कर्मवीर निधीसाठी गोळा करण्यात आलेली आहे. कर्मवीर निधीतील मध्य विभाग सातारा यांनी दिलेल्या 28 लक्ष 78 हजार 115 रुपयांपैकी माहे मे 2010 च्या मिटींगमध्ये वितरीत करणार होते. दक्षिण विभाग सांगलीचा 2008-09 व 2009-10 चा एकूण कर्मवीर निधी 29 लक्ष 320 रुपयांपैकी शाखांच्या सनिटरी ब्लॉकसाठी 5 लक्ष 95 हजार, कर्मवीर पाटील शैक्षणिक संकुल कुंभोज 75 हजार, इंग्लिश स्कुल सांगली इमारतीसाठी 8 लक्ष, ज्ञानदेव घोलप स्मारक सरुड निधी वाटप 1 लक्ष असे एकूण 15 लक्ष 70 हजार खर्च करुन त्यातील 13 लक्ष 30 हजार 320 रुपये शिल्लक आहे.
उत्तर अहमदनगर विभागाकडून 43 लक्ष 97 हजार 740 रुपये गोळा करुन त्यातील टाकळी ढोकेश्वर विद्यालय इमारतसाठी 5 लक्ष 50 हजार, उंदीरगाव विद्यालय 5लक्ष 50हजार, अशोकनगर विद्यालय बांधकाम 2 लक्ष, अळकुटी इमारत 5 लक्ष, भिंगार विद्यालय इमारत 5 लक्ष असे एकूण 23 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले तर त्यातील 20 लक्ष 97 हजार 740 शिल्लक ठेवण्यात आले. पश्चिम विभाग पुणे 25 लक्ष 41 हजार 342 निधी प्राप्त झाला. त्यातील मुक्ताबाई विद्यालय शेळगाव 4 लक्ष 50 हजार, तांदळी स्कुल बांधकाम 4 लक्ष, म.फ.गायकवाड दावडी फरशी बसविणे 1 लक्ष 50 हजार, गोजुबावी स्वच्छता गृहासाठी 2 लक्ष, जय मल्हार विद्यालय, देलवडी 2 लक्ष, डॉ.शंकरराव कोलते पिसर्वे इमारत 2 लक्ष, म. य. होळकर वाफगाव 1 लक्ष, कन्या विद्यालय देहू 2 लक्ष, महात्मा गांधी विद्यालय मंचर उसनवार 5 लक्ष अशी एकुण 24 लक्ष निधी देण्यात आला असुन त्यातील 1 लक्ष 41 हजार 342 शिल्लक आहे. रायगड विभाग, पनवेल येथुन 4 लक्ष 38 हजार 827 रुपये जमा असून मोखाडा चांभारशेत आसे, वावर, आडोशी आश्रमशाळांना संगणक फर्निचरसाठी 93 हजार व सह्याद्रीनगर विद्यालय 86 हजार 400 इतकी रक्कम खर्च असून त्यातीलही 2 लक्ष 59 हजार 427 रुपये संस्थेने शिल्लक ठेवलेले आहे. अशी एकुण रक्कम 75 लक्ष 21 हजार 805 रुपये त्यावेळी शिल्लक ठेवण्यात आली आहे.
साधारणपणे कर्मचारी वर्गाकडून गोळा रकमेपैकी पाऊणे दोन कोटी संस्थेकडे असतात. यात विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीचे अनुदान, मुख्यमंत्री फंड, जिल्हा परिषद अनुदान, इजीएस अनुदान आकडेंचा ताळेबंदही कोटीत आहे. नेमकी संस्था इतका पैसा गोळा करुन काय करते. याचा हिशोब देण्याची सध्यातरी गरज आहे.
क्रमशः
आता पालक शिक्षकांनीच पुढे यावे !
रयत शिक्षण संस्थेत एकीकडे नोकरभरतीत झालेला गोंधळ आणि करोडो रुपयांच्या साठ्याचे नेमके काय केले जाते. याचा हिशोब घेण्यासाठी व भ्रष्ट मार्गाने प्राध्यापक भरती पार पाडलेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी रयतसंस्थेतील कंत्राटी प्राध्यापक आणि भविष्याचे स्वप्न बघणार्या पालकांनी पुढे येण्याची गरज असुन, तरच रयत तारली जाईल. अन्यथा याचा परिणाम भविष्यात विद्यार्थी संख्येवर झाल्याशिवाय राहणार नाही.