नेवासा/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने केलेल्या डिझेल व पेट्रोल दरवाढीचा नेवासा तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदा...
नेवासा/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने केलेल्या डिझेल व पेट्रोल दरवाढीचा नेवासा तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात डिझेल व पेट्रोलचे दर कमी करण्याची मागणी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली.
शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या आडमुठया धोरणामुळे डिझेल व पेट्रोल ची भरमसाठ महागाई करण्यात आली आहे,त्यामुळे शेतकर्यांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून ही दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, तसेच केंद्र सरकार मध्ये सामील असणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांचे आंदोलन चिनी व पाकिस्तानी लोकांनी पेटवलेले आंदोलन आहे असे वक्तव्य केले होते. त्याचा ही निवेदनात निषेध करण्यात आला आहे. यावेळी बोलतांना जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके म्हणाले की, नेवासे ही माऊलींची भूमी असल्याने आम्ही रास्ता रोको सारखे आंदोलन न करता केंद्र सरकारने केलेल्या डिझेल व पेट्रोल दरवाढीचा निषेध करत आहोत. तसेच केंद्रीय मंत्री दानवे यांनी शेतकर्यांच्या आंदोलनाविषयी केलेल्या वक्तव्याचा ही आम्ही निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके,तालुका प्रमुख मच्छीन्द्र म्हस्के, अंबादासराजे लष्करे, गोरक्षनाथ घुले, उप तालुका प्रमुख मुन्ना चक्रनारायण, नारायण लष्करे, पंकज लंभाते, रामानंद मुंगसे, सारंग कोलते, राजेंद्र येळवंडे, अनिल जाधव, सोहेल सय्यद, अलीभाई शेख, अमोल खाटीक, मालोजीराव गटकळ, विलास गरुड, इलियास आतार यांच्या निवेदनावर सहया आहेत.