1 ठार;2 गाड्या जळून भस्मसात इस्लामपूर / प्रतिनिधी : बस्तवडे (ता. तासगाव) येथे जमिनीचे सपाटीकरणच्या कामावर ब्लास्टिंग उडवण्यासाठी आलेल्या 2...
1 ठार;2 गाड्या जळून भस्मसात
इस्लामपूर / प्रतिनिधी : बस्तवडे (ता. तासगाव) येथे जमिनीचे सपाटीकरणच्या कामावर ब्लास्टिंग उडवण्यासाठी आलेल्या 2 गाड्याचा स्फोट झाल्यामुळे तासगाव तालुका हादरला. या भीषण स्फोटात 1 ठार व 3 जखमी आहे. यामध्ये 2 ट्रक आगीत भस्मसात झाले आहेत. यात प्रतिक स्वामी (वय 22, रा. नागज, ता. कवठेमहांकाळ) यांचा मृत्यू झाला. तर ईश्वर बामणे (वय 21) व महेश दुडणावार (वय 25, रा. अथणी) व अन्य एकजण जखमी आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बस्तवडे गावात संभाजी चव्हाण व अन्य 3 शेतकर्यांनी विजयसिंहराजे पटवर्धनांची जमीन (गट नंबर 377) विकत घेतली आहे. सर्व डोंगराळ भाग असल्यामुळे मागील 6 ते 7 महिन्यापासून जमीन सपाटीकरणाचे काम सुरू होते. येथे दररोज 40 मजूर व 3 जेसीबी आणि 10 ते 15 डंपरच्या सहाय्याने जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. जवळपास 100 फूट उंचीचा डोंगर फोडून सपाटीकरणाचे काम सुरू होते.
रविवारी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. सुरुंग उडवण्यासाठी मोठी छिद्र पाडण्याचे काम दिवसरात्र सुरू होते. यामुळे ट्रक गरम झाले होते. त्याचवेळी एका ट्रकचा स्फोट झाला व या स्फोटामुळे शेजारी असणारे दुसर्या ट्रकमधील कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. दुपारी 3 च्या दरम्यान ही घटना घडली. या स्फोटामध्ये 1 कामगार जागीच ठार झाला व अन्य 3 कामगार जखमी झाले. यापैकी 2 कामगार गंभीर जखमी आहेत. जखमींना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भयानक स्फोटाने घटनास्थळापासून 10 किमी अंतरावर असणारा परिसर हादरला असून अनेक घरांना तडे गेले आहेत. पोलीस पाटील दत्तात्रय पाटील यांनी स्फोटाची माहिती पोलिसांना दिली.
जिल्हा पोलिस उपप्रमुख मनिषा डूबुले, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, सपोनि पंकज पवार पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची चौकशी करत आहेत. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले होते. या पथकाने घटनास्थळावरील जिलेटिनच्या काड्या शोधून जप्त केल्याची माहिती मिळते.
मृतदेहाचे तुकडे अस्ताव्यस्त विखुरले
घटनास्थळी अनेक ठिकाणी मृत व्यक्तीच्या शरीराचे तुकडे 700 ते 800 फूट अंतरावर जाऊन अस्ताव्यस्त पडले आहेत. तसेच गाड्यांचे भाग सुध्दा दूरवर जाऊन पडले आहेत. रात्री उशिरापर्यंत मयत व्यक्तीच्या शरीराचे मुंडके सापडले नव्हते.
स्फोटाने अनेक घरांचे नुकसान
या स्फोटामुळे बस्तवडे, सावळज या गावामधील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांना तडे, भिंतीला चिरा पडल्या आहेत. अनेक घरामध्ये खिडकी, कपाट यांच्या काचा फुटल्या आहेत. यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकशीची मागणी
जमीन सपाटीकरणाचे काम सुरू असताना झालेल्या भीषण स्फोटाने तासगाव तालुका हादरला. यामध्ये सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठा अपघात झाला असून अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
स्फोटाबाबत संभ्रमावस्था
घटनास्थळी झालेला स्फोट कशामुळे झाला याबाबत संभ्रमावस्था होती. सुरुंग उडविण्यासाठी आणलेल्या जिलेटीनच्या कांड्यामुळे स्फोट झाला की, ट्रकमध्ये असणार्या कॉम्प्रेसरचा याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. याच ट्रकमध्ये सिलेंडर टाकी व डिझेल टाकी सुध्दा होती. घटनास्थळी दोन ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या ट्रकमध्ये जिलेटीन होते. त्याचा स्फोट होण्याची भीती होती म्हणून जमावाला येथे जाऊन दिले जात नव्हते. मात्र, तासगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडस करून गाडी प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन गेले व पाणी मारून आग विझवली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या धाडसाचे कौतुक घटनास्थळी होत होते.