सकाळच्या कार्यकारी संपादकावर खुनाचा गुन्हा रेखा जरे खूनप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय अहमदनगर : अहमदनगर शहरातील यशस्विनी महिला बिग...
सकाळच्या कार्यकारी संपादकावर खुनाचा गुन्हा
रेखा जरे खूनप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय
अहमदनगर : अहमदनगर शहरातील यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाउसाहेब जरे पाटील यांच्या हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे.
अहमदनगर पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर रेखा जरे यांचे मारेकरी समोर आले आहेत. अहमदनगरचे जिल्हा पोलीस अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी या हत्याचा कट रचला असून त्यांनीच अटक केलेल्या पाच आरोपींना रेखा जरे यांची सुपारी दिली होती.
तर मुख्य आरोपी बाळासाहेब बोठे यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून पाच पथके रवाना झाली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.
नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात सोमवारी रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेकऱ्यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती.
रेखा जरे यांच्या मुलाने काढलेल्या फोटो मुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकऱ्यांचा श्रीरामपूर व राहता परिसरात शोध घेतला. अखेर राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात मंगळवारी रात्री दोघांना; तर कोल्हापूर येथून एकाला अटक केली.
रेखा जरे आपली आई, मुलगा व मैत्रीण माने यांच्यासह कामानिमित्त पुण्याला गेल्या होत्या. परतताना नगर-पुणे रस्त्यावर नारायणगव्हाणजवळ दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी जरे यांची गाडी अडवत 'आमच्या गाडीला धक्का का मारला', अशी विचारणा करत वाद घालण्यास सुरुवात केली.
जरे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आरोपींनी पुढे जातेगाव घाटात जरे यांचे वाहन पुन्हा अडवले. फिरोज शेख वाहनाच्या पुढे उभा राहिला, तर आरोपी गुड्डूने जरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
जरे यांनी वाहनाची काच खाली करताच फिरोजने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्लेखोर नगरच्या दिशेने निघून गेले. वाघुंडे टोलनाक्याजवळून ते पुन्हा पुण्याच्या दिशेने गेले. आरोपींच्या मोबाइल लोकेशनवरून ही बाब स्पष्ट झाली होती.