कामांचा घेतला स्वतः प्रत्यक्ष पाहणी करत आढावा कोपरगाव श./ प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील विविध विभागांच्या प्रशासकीय तसेच कार्यालयीन कामका...
कामांचा घेतला स्वतः प्रत्यक्ष पाहणी करत आढावा
कोपरगाव श./ प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील विविध विभागांच्या प्रशासकीय तसेच कार्यालयीन कामकाज, संबंधित अधिकारी यांचे योजनांचे नियोजन व नियंत्रण, प्रलंबित कामे आणि संभाव्य नियोजनाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोपरगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले आठवड्यातून एक दिवस जिल्ह्यातील एका तालुका मुख्यालयी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतात. तसेच त्या-त्या तालुक्यातील काही स्थळांना भेटही देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात. कोपरगाव येथे तहसिल कार्यालयात तहसिलदार यांचे दालनात जिल्हाधिकारी यांच्या आढावा बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे यावेळी स्वागत केले. तहसिलदार योगेश चंद्रे यांनीही शाल, पुष्पगुच्छ आणि 'असे होते कोपरगाव' हे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे स्वागत करुन कोपरगाव तालुक्यातील विविध प्रलंबित समस्या मांडल्या. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार योगेश चंद्रे, कृषी अधिकारी अशोक आढाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, सामाजिक वनीकरण वनपरीक्षेत्र अधिकारी पुजा पिंगळे, वनरक्षक रामकृष्ण सांगळे,गोदावरी डावा कालव्याचे भरत दिघे,गोदावरी उजवा कालव्याचे महेश गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वाकचौरे,आगर व्यवस्थापक अभिजित चौधरी, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांचे सह सर्व प्रशासकीय कार्यालयाचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.
सुमारे पाच तासांच्या कोपरगाव तालुक्याच्या भेटीत जिल्हाधिकारी यांनी दोन स्थळांची पाहणी केली आणि विविध खाते प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आरोग्य विभागाच्या कोरोना संसर्ग निर्मुलन उपाय योजना, कोपरगाव नगरपरिषदेचे पाणी साठवण तलावाचे संभव्य कामकाज,पाटपाण्याचे आवर्तन नियोजन, सामाजिक वनीकरणाचे वृक्षारोपण, शहर व तालुका पोलिस स्टेशन कामकाज, नवीन वाहन खरेदी, कृषी विभागाचे रब्बी पिक पेरणी नियोजन व अनुदान वाटप अहवाल, शासनाच्या मालकीच्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती यासह विविध खातेनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी औद्योगिक वसाहत,पाच क्रमांक साठवण तलाव या ठिकाणी भेट देवून स्थळ पहाणी केली.