अहमदनगर / प्रतिनिधी : भिंगार परिसरात असणार्या ’स्वामी रेसिडेन्सी’ या घरावर बुधवारी सकाळी सात वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. एका...
अहमदनगर / प्रतिनिधी : भिंगार परिसरात असणार्या ’स्वामी रेसिडेन्सी’ या घरावर बुधवारी सकाळी सात वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. एका दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी हा फौजफाटा आला; मात्र याची कुणकुण लागताच संबंधित आरोपीने बंगल्याचे दरवाजे लावून घेतले व तो आतमध्ये बसला. शेवटी आठ तासानंतर पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडून आरोपीला अटक केली.
लॉरेन्स स्वामी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वामीविरुद्ध काही दिवसापूर्वी भिंगार पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिस स्वामी याला त्याच्या बंगल्यासमोर उभे राहून बाहेर येण्याचे आवाहन करीत असताना तो घरात बसल्याबसल्या सूत्रे हलवत होता. न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी तो प्रयत्न होता. ध्वनिक्षेपकावरून पोलिसांनी त्याला बाहेर येण्याचे वारंवार आवाहन केले; परंतु स्वामी घराबाहेर आला नाही. अखेर दरवाजा तोडून त्यास पोलिसांनी अटक केली. पोलिस उपाधिक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
टोलनाक्यावरील दरोड्याच्या गुन्ह्यात स्वामी आरोपी आहे. तो टोल कंत्राटदार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी नगरजवळ पाथर्डी रस्त्यावरील एका आलिशान घरावर पोलिसांनी भल्या सकाळीच छापा टाकला; मात्र सर्च वॉरंट नसल्यामुळे पोलिसांना घरांमध्ये जाता आले नाही. याचा फायदा घेत संबंधित आरोपी बंगल्याचे दरवाजे लावून आतमध्ये बसला. पोलिसांच्या या कारवाईची मात्र नगर शहरासह जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी दरवाजे तोडण्यासाठी तयारी केली; मात्र तेथे काही महिला कार्यकर्त्या आल्या व त्यांनी तुमच्याकडे ’सर्च वॉरंट’ आहे का? अशी विचारणा केली. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडण्याचे काम थांबवले.
---------------------------
बोठे लपल्याच्या चर्चेला उधाण
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे हा पसार आहे. बोठे हाच भिंगार येथील या आलिशान बंगल्यामध्ये असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे एवढा मोठा फौजफाटा येथे दाखल झाल्याचे बोलले जाऊ लागले. प्रत्यक्षात ही वेगळी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.