माजलगांव । प्रतिनिधीः- स्टेट बँक ऑफ इंडिया माजलगांव शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मुख्य मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे माजलगांव ताल...
माजलगांव । प्रतिनिधीः-
स्टेट बँक ऑफ इंडिया माजलगांव शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मुख्य मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे माजलगांव तालुकाध्यक्ष अरुण माणिकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी अनोखे आंदोलन केले. कोरोनाचे कारण सांगून शेतकर्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्या बँक शाखेच्या मनमानीला कंटाळून शेतकर्यांनी पीपीई किट परिधान करून सिडको येथील बँकेच्या क्षेत्रीय अधिकारी शाखेसमोर आंदोलन केले. तुम्ही आता कोरोनाची भीती बाळगू नका, आम्ही पीपीई किट घालून आलोय, आमच्या व्यथा ऐकून न्याय द्या, असे साकडे आंदोलनकर्त्यांनी बँकेच्या अधिकार्यांकडे घातले.
माजलगांव येथील एसबीआय शाखेत माफी मिळालेल्या सुमारे बाराशे लाभार्थी शेतकर्यांचे पीक कर्ज नाकारण्यात आले आहे. पीक कर्ज कोणत्या कारणाने नाकारले याची माहिती देण्यात आली नाही. हे विचारण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांना कोरोनाचे कारण सांगून भेटण्यास टाळाटाळ करण्यात येते. बँकेच्या गेटसमोर शेतकर्यांना ताटकळत उभे रहावे लागते. शेतकर्यांबरोबरच पेन्शन धारक वयोवृद्धांची हेळसांड बँकेतील अधिकारी, कर्मचारी करतात. गुराळासाठी कर्ज मंजूर झालेले परंतु बँकेची पॉलिसी न घेतल्यामुळे वर्षभरापासून कर्ज देण्यात आलेले नाही. कर्जाची कामे दलालांमार्फत केल्यास त्यांची फाईल त्वरित मान्य करण्यात येते. बँकेच्या शाखाधिकार्यांना यासंदर्भात भेट घेण्याचा प्रयत्न केल्यास कोरोनाचे कारण पुढे करून ते भेट घेण्यास चार- पाच महिन्यांपासून टाळाटाळ करत आहेत. या व्यथा मांडण्यासाठी शेतकर्यांनी सिडको येथील बँकेच्या क्षेत्रीय अधिकारी शाखेसमोर आंदोलन केले. पीपीई किट परिधान करून शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. बँकेचे कारभार, शाखाधिकारी आणि तेथील कर्मचार्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, एसबीआयने माजलगांव तालुक्यात नवीन स्वतंत्र कृषी शाखा सुरू करावी यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. भाजपचे माजलगांव तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात बबन सोळुंके, ज्ञानेश्वर मेंढके, डॉ. भागवत सरवदे, बबनराव सिरसाट, कल्याणराव शेप, राधाकिशन सरवदे, नामदेव मुळे, अनंतराव जगताप, ईश्वरअप्पा खुर्पे, डॉ. अशोक तिडके, ज्ञानेश्वर सरवदे, अनंत शेंडगे, दत्तात्रय साडेगावकर, रमेशराव कुटे, सतीश राठोड यांच्यासह शेतकर्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, माजी महापौर बापू घडामोडे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. बँकेच्या अधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन मागण्यांच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.