मुंबईः ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवण्याची शक्यता आहे. पण महाविकास आघाडीतील घटक पक...
मुंबईः ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवण्याची शक्यता आहे. पण महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवण्याबाबत साशंक असून, वेगवेगळी विधानं करत सुटले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवणार का?, याबाबत सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे.
गावागावात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचंच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.औरंगाबाद महापालिका निवडणूक काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची तयारी केलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या रूपाने एकत्र लढणार आहे. तशी माहिती महाविकास आघाडीच्या गोटातून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी औरंगाबादेतील निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस वेगळी लढत आहे, त्यामुळे बेबनावचा प्रश्नच येत नसल्याचं शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.
औरंगाबाद महापालिकेची लवकरच निवडणूक होणार आहे. ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांची इच्छा असल्याचंही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले आहेत. मुंबईतील गांधी भवन येथे बैठक झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मार्गदर्शन केलं. ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हाच्या नावे नसते. जी लोक लोकसेवा करतात. ते त्या त्या पातळीवर निवडणुका लढत असतात, असंही अमित देशमुख यांनी सांगितलं.
ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस वेगळी लढत आहे, त्यामुळे बेबनावचा प्रश्नच येत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत चिन्हं राहत नाही. ही निवडणूक स्थानिक पातळीवर होते. ग्रामपंचायतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेच्या नावानं लढतील आणि निवडून येतील, असंही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. निवडून आल्यानंतर कुठला सदस्य कमी जास्त झाला, त्यावेळची परिस्थिती वेगळी आहे. आघाडीचा प्रश्नच नाही, ज्या वेळी सरपंच निवडले जातील, त्यावेळी आघाडीचा प्रश्न येईल, असा विश्वासही अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. ही निवडणूक चिन्हावर लढली जात नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रश्नच येत नाही. या निवडणुका होतात, त्या गाव पॅनलवर होतात, असंही त्यांनी सांगितलं.
पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असले तरी भविष्यकाळात त्याची भरपाई करणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय का?, असा प्रश्न त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी उत्तर दिलंय. ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष चिन्हावर, एबी फॉर्मवर निवडणूक लढवत नाही. प्रत्येक गावातील वेगवेगळे प्रश्न घेऊन गट उभे राहत असतात, यामुळे ग्रामपंचायती निवडणुकांत पक्षाचे राजकारणाव्यतिरिक्त गावातील स्थानिक राजकारणावर निवडणूक चालत असतात, असंही ते म्हणाले.
गेल्या वेळी 8000 पेक्षा जास्त ग्रामपंचायती भाजपकडे होत्या, यावेळी जनतेतून निवड नाही, त्यामुळे सरपंच नेमक कोणाचा हे कळणार नाही. फोडाफोडीच्या राजकारणात राष्ट्रवादीचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादीकडून साम-दाम-दंड-भेद वापरलं जाईल. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला निवडून आणू, असंही अजित पवार म्हणाले.