इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने इस्लामपूर नगर पालिकेसमोर शहरातील अन्यायकारक व वाढीव घरपट्टीच्या विरोधात तीव्र...
इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने इस्लामपूर नगर पालिकेसमोर शहरातील अन्यायकारक व वाढीव घरपट्टीच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. वाढीव घरपट्टीच्या बिलांची होळी करून जाहीर निषेध करण्यात आला. इस्लामपूर शहरवासीयांची वाढीव घरपट्टी तातडीने कमी करावी, अन्यथा नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करताना, आता आम्ही शहरातील नागरिकांची वाढीव घरपट्टी कमी केल्याशिवाय थांबणार नाही, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, इस्लामपूर नगरपालिके समोर वाढीव घरपट्टीच्या बिलांची होळी करतण्यात आली.
इस्लामपूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,नगरसेवक खंडेराव जाधव,माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे,नगरसेवक डॉ. संग्राम पाटील,बशीर मुल्ला, सुनिता सपकाळ, संगीता कांबळे, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांनी पूर्वी शहराच्या विकासाला गती देताना कधीही घरपट्टी वाढविली नाही. मात्र, आताच्या वाढीव घरपट्टीचे पाप सत्ताधार्यांचेच आहे. नगराध्यक्षांना शहराच्या विकासाला पुढे घेवून जाता येत नसेल, वाढीव घटपट्टी कमी करता येत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आमची राज्यात सत्ता येताच ना. जयंतराव पाटील यांनी शहराच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी दिला आहे. नगराध्यक्ष पब्लिसिटीशिवाय काही करत नाहीत.
नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले, शहरातील जनतेस मोठ-मोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या या मंडळींना शहराचा विकास करता आलेला नाही. ते पूर्ण अपयशी ठरले आहेत. शहरातील रस्ते,भुयारी गटारीच्या कामाची काय अवस्थ केली आहे? शहरातील नागरिक डेंग्यू, मलेरियाच्या साथीने त्रस्त झाले आहेत. शहराचा विकास हे सत्ताधार्यांचे ध्येय नसून प्रत्येक बाबीत राजकारण करीत आहेत.
नगरसेवक आनंदराव मलगुंडे म्हणाले, सध्या इस्लामपूर शहरातील नागरिकांना स्वतःचे घर नको,भाड्याचे घर बरे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रशासनात कोणताही ताळमेळ नाही. घर बांधकामास जाचक अटी घातल्या आहेत. हे थांबायला हवे.
राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, नगरसेविका सुनिता संपकाळ, संगीता कांबळे,रोझा किणीकर यांनीही वाढीव घरपट्टीचा जाहीर निषेध केला.
प्रारंभी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील यांनी वाढीव घरपट्टीचा जोरदार निषेध करीत घरपट्टीचा आढावा मांडला. या आंदोलनात युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी, सदानंद पाटील,आयुब हवालदार, रफिक पठाण, शकील जमादार, मोहन भिंगार्डे, गोपाल नागे, मानसिंग पाटील, जुबेर खाटीक, रणजित तेवरे, प्रियांका साळुंखे, शैलजा जाधव, सागर जाधव, अभिजित रासकर,अभिजित कुर्लेकर, अभिजित पाटील, शिवराज पाटील, सागर चव्हाण, संदीप माने, बाळासो कोळेकर, वसंत कुंभार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष स्वरुप मोरे यांनी आभार मानले.