तापमान 10 अंशापर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका जळगाव/प्रतिनिधी ः जिल्ह्यातील तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. बुधवारी जळगावात 10 अंश स...

तापमान 10 अंशापर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका
जळगाव/प्रतिनिधी ः जिल्ह्यातील तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. बुधवारी जळगावात 10 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेले. यावर्षीच्या हंगामातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात मोठा बदल होत आहे. उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांना कोणतीही अडथळा नसल्याने जिल्ह्याच्या तापमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगावात किमान तापमान 10 अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. यंदा थंडीचे आगमन ऑक्टोबर महिन्यातच झाले होते. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील थंडी गायबच होती. वातावरणातील बदलामुळे व सातत्याने निर्माण होणार्या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, आता वातावरण पूर्णपणे कोरडे झाले आहे. यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसात तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या 8 दिवसात जळगावच्या किमान तापमानात तब्बल 10 अंशांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे किमान तापमानात वाढ झाली होती. 8 दिवसांपूर्वी किमान तापमान 19 अंशांवर होते. मात्र, बुधवारी तापमान 10 अंशांपर्यंत खाली आले. आठवडाभर तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, कमाल तापमानात फार काही घट झाली नसून, कमाल तापमान 29 ते 31 अंशांवर स्थिर आहे. कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. कडाक्याचा थंडीमुळे रब्बी पिकांना जास्त पाणी भरण्याचे काम पडत नाही. गहू व हरभर्याच्या वाढीसाठी देखील थंडी उपयोगाची ठरत आहे. तालुक्यात रब्बी हंगामाची जवळ-जवळ 100 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आठवड्याभरात उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमानात सारखी वाढ होती होती. मात्र, सोमवारी व मंगळवारी जम्मू काश्मिरच्या पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर उत्तरप्रदेशातील काही भागात झालेल्या गारपिटीमुळे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. तसेच या वार्यांचा वेग व प्रमाण देखील जास्त असल्याने उत्तर महाराष्ट्रात पुन्हा थंडीचे आगमन जिल्ह्यात झाले आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात वार्यांचा वेग देखील वाढला आहे. जळगाव शहरात 9 ते 11 किमी प्रतितास या वेगाने वारे वाहत आहेत. दाब जास्त असल्याने वार्यांचा वेग वाढत असतो. दरम्यान, अजून दोन दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून, त्यानंतर उत्तरेकडील वार्यांच वेग मंदावणार आहे.
राज्यभरातही थंडीची लाट
देशातील उत्तरेकडे असणार्या राज्यांमध्ये आलेली शीतलहर आता राज्यातही परिणाम दाखवू लागली आहे. राज्यात सर्वात निचांकी तापमान परभणीत नोंदवले गेले आहे. मंगळवारी 5.1 तर आज तापमानात वाढ होऊन पारा 5.5 अंशावर गेला आहे. नांदेड जिल्ह्यातही चांगलीच थंडी वाढली असून तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. मंगळवारी विविध जिल्ह्यातील तापमानाची नोंद-