बीड। प्रतिनिधीः परतीच्या पावसामुळे मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 20 आणि 21...
बीड। प्रतिनिधीः परतीच्या पावसामुळे मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 20 आणि 21 डिसेंबर रोजी केंद्राचे पथक पुणे, औरंगाबाद आणि विदर्भाच्या दौर्यावर आहेत. औरंगाबाद विभागातील त्यांनी सर्वात जास्त नुकसान झालेल्या बीड जिल्ह्याला वगळले असून हे पथक एकमेव अशा उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहे. केंद्राचे पथक नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्यात येत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वरातीमागून घोडे नाचवत तब्बल तीन महिन्याच्या नुकसानीनंतर केंद्राचे आपत्ती व्यवस्थापन निवारण विभागाचे पथक राज्यातील तीन महसूल विभागांचा दौरा करणार आहे. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील दोन, विदर्भातील दोन आणि औरंगाबाद विभागातील दोन जिल्ह्यांचा दौरा करणार होते. या बाबतची सविस्तर रुपरेषा या पथकाने जिल्हा प्रशासनाकडून मागून घेतली होती. बीड जिल्हा प्रशासनानेही या पथकाला जिल्ह्यातील शेतकर्यांचे नुकसान झालेले कापूस, सोयाबीन, बाजरी या पिकांचा आराखडा तयार केला होता मात्र नुकतेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या पत्रानुसार या केंद्रीय पथकाने औरंगाबाद विभागातील फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीच्या पाहणीसाठी दौरा आखला आहे वास्तविक पाहता बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचेेही किमान 30 ते 40 टक्के खरीप पिकांचे नुकसान झालेले आहे. केंद्राच्या पथकाने पाहणी केल्यानंतर केंद्रीय आपत्ती नुकसान निर्देशांकानुसार नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळाली असती मात्र बीड जिल्हा वगळल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांनी केंद्राच्या या भेदभाव नितीमुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे.