मेलबर्न ः ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसर्या कसोटीत भारतीय खेळाडूंनी दर्जेदार खेळांचे प्रदर्शन करत, 8 गडी राखून विजय मिळवला. त...
मेलबर्न ः ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसर्या कसोटीत भारतीय खेळाडूंनी दर्जेदार खेळांचे प्रदर्शन करत, 8 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे 4 सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे अजिंक्य रहाणे ने माजी कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. कर्णधार म्हणून पहिले तीन सामने जिंकणारा रहाणे दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी धोनीने हे आश्चर्यकारक कामगिरी केली. कर्णधारपदी पहिल्या चार सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना 195 धावांत गुंडाळले. यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात 326 धावा केल्या आणि 131 धावांची आघाडी घेतली. दुसर्या डावातही ऑस्ट्रेलियन संघ 200 धावा करण्यास सक्षम झाला आणि भारताला विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने 2 गडी गमावून पूर्ण केले. मेलबर्न कसोटीत आपल्या शतकी खेळीने व नंतर विजयी धाव काढलेल्या नाबाद 22 धावांच्या खेळीने रहाणेने कर्णधार म्हणून अजिंक्य राहण्याचा आपला पराक्रम कायम ठेवला आहे. त्याने शतक केलेला सामना भारत गमावत नाही ही परंपरासुध्दा कायम राहिली आहे. असे असले तरी या ‘अजिंक्य’ कर्णधाराने आपल्या संघाच्या यशाचे श्रेय पदार्पणवीर शुभमान गील व मोहम्मद सिराज यांच्या चांगल्या कामगिरीला दिले आहे. अडिलेडमधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर या दोघांनी जी खंबीरता दाखवली ती कौतुकास्पद असल्याचे त्याने म्हटले आहे. कसोटी सामना जिंकण्यासाठी 70 धावांचे लक्ष्य तसे मोठे नसते पण जो संघ 10 दिवसांपूर्वीच अवघ्या 36 धावात बाद झाला त्याच्याबद्दल असे म्हणणे धाडसाचे ठरते. पण ते 36 धावांचे भूत अजिंक्यच्या नेतृत्वात भारतीय खेळाडूंनी पूर्णपणे गाडले. त्याला शब्दशः मूठमाती दिली. शुभमान 35 धावांवर तर सामनावीर कर्णधार अजिंक्य रहाणे 27 धावांवर नाबाद राहिला. चौथ्याच दिवशी भारताने सामना जिंकला आणि ही मालिका भारतीय संघ 4-0 अशी गमावेल अशी टिंगल करणारे तोंडघशी पडले.
दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारताचा विजय
दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व आले आहे. याचबरोबर भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा देखील संघात नाही. अशा दिग्गजांच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे याने केलेले नेतृत्व, त्याची कल्पकता भारतीय संघाला विजय मिळवून देणारी ठरली. मार्च 2017 मध्ये प्रथमच अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला विजय मिळवून दिला. यानंतर रहाणेने बंगळुरुमध्ये सन 2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेल्या कसोटीत भारतीय संघाला 262 धावांनी विजय मिळवून दिला. रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने आता ऑस्ट्रेलियाला मेलबर्नमध्ये 8 गडी राखून पराभूत केले आहे.
शुभमान व सिराजचे रहाणेकडून कौतुक
पहिलाच सामना खेळणार्या शुभमान व सिराजचे कौतुक करताना कर्णधार म्हणाला, या खेळाडूंचा खरोखर अभिमान वाटतो. ते ज्या खंबीरतेने खेळले त्यासाठी त्यांनाच श्रेय द्यायला हवे. दुसर्या डावात उमेश यादवसारखा खेळाडू उपलब्ध नसताना त्यांनी दाखवलेला कणखरपणा महत्त्वाचा ठरला. पाच गोलंदाजांची योजना महत्त्वाची ठरली. अष्टपैलु खेळाडूचा आम्ही विचार करत होतो पण जडेजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली. शुभमानने त्याचा लढावु बाणा आणि संयमी वृत्ती दाखवली. सिराजने अगदी शिस्तीत गोलंदाजी केली.