ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने त्याचे जगावर कसे परिणाम झाले, हे काळ्या सोमवारने दाखवून दिले. जगभरातील विशेषतः आशिया खंडातील शेअर बाजार...
ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने त्याचे जगावर कसे परिणाम झाले, हे काळ्या सोमवारने दाखवून दिले. जगभरातील विशेषतः आशिया खंडातील शेअर बाजारांनी दाखवून दिले. एकट्या भारतात गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. ज्या गतीने बाजार वाढत होता, ती पाहता करेक्शन होणार, हे अपेक्षितच होते; परंतु याचा अर्थ बाजार लोटांगण घेईल, असे कुणालाच वाटले नव्हते. भांडवली बाजाराचा आलेख वाढण्याचे कारण जसे कोरोनाच होता, तसेच अधपतनासही कोरोनाच कारणीभूत आहे. भारतात तर चार मे नंतर मोठी घसरण झाली. कोरोनाच्या लसी बाजारात आल्यानंतर कोरोनावर मात करता येईल, असा जो विश्वास निर्माण होत होता, त्याचे अनुकूल पडसाद भांडवली बाजारात आणि एकूणच पुनश्च हरिओममध्ये उमटत होते. सारे काही स्थिरसावर होण्याच्या मार्गावर असताना ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला. घातक आणि परावर्तीत विषाणूने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या विषाणूची जगावर दहशत बसली आहे. युरोप खंडातील अनेक देशांनी ब्रिटिश नागरिकांना आपल्या देशात यायला बंदी घातली आहे. ब्रिटन, जर्मनीसह अनेक देशांनी टाळेबंदी लागू केली आहे. टाळेबंदीने अर्थव्यवस्था धोक्यात येत असताना हे माहीत असताना आता टाळेबंदीशिवाय अन्य काही उपायही नसल्याने तिच्याशिवाय पर्याय नाही, ही वस्तुस्थितीही समोर आली आहे. भारत सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनहून भारतात येणार्या सर्व विमानसेवा तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्यात येणार आहे. युरोपीयन देशांनीही या आधीच ब्रिटनमधून येणार्या विमानसेवेला बंदी घातली आहे. त्याआधी ब्रिटनहून भारतात आलेल्या सर्व प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ब्रिटनकडे जाणारी आणि ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद करण्याची मागणी केली होती. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना फैलावत असल्याने भारतातही त्याचा फैलाव होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय घ्यावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले होते. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची नवी प्रजाती आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे. त्यामुळे अनेक देशांनी ब्रिटनला जाणारी विमाने रद्द केली आहेत. या नव्या कोरोना विषाणू मुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही आपत्कालीन बैठक घेतली.
भारत सरकार नव्या कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात गुंतले असताना जगातील सर्व देश सतर्क झाले आहेत. युरोपमधील बहुतांश देशांनी ब्रिटनमधून येणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच, जर्मनीसुद्धा ब्रिटनहून येणार्या विमानांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. नेदरलँडने डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रिटनमधील विमानाला देशात उतरण्यास बंदी असल्याचे जाहीर केले आहे. ऑस्ट्रिया आणि इटली या देशांकडूनही खबरदरी घेण्यात येत आहे. ब्रिटनहून येणारे विमान देशात उतरण्यावर बंदी घालण्याचा विचार या देशांकडून सुरू आहे. इटलीचे परराष्ट्रमंत्री लुइगी डी मायो यांनी आवश्यक ते उपाय करण्याची गरज व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूची नवी प्रजाती आढळल्यामुळे जगभरात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तो किती घातक असावा, त्याच्या प्रसाराची क्षमता अशी असावी, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. नव्या कोरोना विषाणूला समजून घेण्यासाठी कोरोना विषाणूमध्ये झालेले बदल समजून घ्यावे लागतील. विषाणूमध्ये झालेला बदल हा स्वाभावीक आहे. जास्त संक्रमणासाठी कोणताही विषाणू स्व:तला बदलून घेत असतो. तसेच कोरोना विषाणूच्या बाबतीत झाले आहे. 2020च्या वर्षात कोरोना आला, त्याने पाय पसरले, सगळ्या जगाला कवेत घेतले, सगळे जग ठप्प केले, अनेकांनी जीव गमावला, आता 2020 च्या शेवटी कोरोना लस तयार झाल्या आहेत. लवकरच या लस अनेकांना टोचल्या जातील; मात्र या कोरोना लस कोरोना स्ट्रेनवर प्रभावी ठरतील का, या प्रश्नाचे उत्तर आता शास्रज्ञ शोधत आहेत. ब्रिटीश शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नवीन कोरोना स्ट्रेनवर सध्याची कोरोना लस प्रभावी ठरेल. ही लस लोकांची प्रतिकारशक्ती वाढवणार आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना ते सहजरितीने करू शकतात; मात्र कोरोनाचे नवनवे स्ट्रेन येत राहिले तर ती डोकेदुखी ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अधिक सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेला संबोधित करताना पुन्हा टाळेबंदी जाहीर करण्याची वेळ आणू नका, असे बजावले होते; परंतु दोनच दिवसात ठाकरे सरकारवर रात्रीची संचारबंदी लागू करण्याची वेळ आली. त्यामुळे रात्रीच्या संचारबंदीच्या पावलांनी मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा टाळेबंदी येणार का, असा सवाल नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. नवीन वर्ष उंबरठ्यावर आहे. नाताळपासूनच नववर्षाचा जल्लोष सुरू होतो. या काळात नागरिकांकडून हलगर्जी होऊ नये आणि कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस अनेक जण रात्रभर सेलिब्रेशन करतात; मात्र घराबाहेर एकत्र जमून होणार्या जल्लोषावर मर्यादा यावी, यासाठी अतिरिक्त बंधने घालण्यात आली आहेत.
संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणार्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सात दिवसांसाठी स्वखर्चाने त्यांना जवळच्या हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगीकरण करावे लागेल. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क राहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. अन्य देशांमधून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना घरीच विलगीकरणात ठेवले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणार्या विमानतळावरील सर्व कर्मचार्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. युरोप आणि इंग्लंडमध्ये कडक टाळेबंदी सुरू झाली आहे. कोरोनाची चौथी लाट आली आहे. त्यामुळे सावध राहा. राज्यात कोरोनावर नियंत्रण आहे. 70 टक्के नागरिक मुखपट्टी लावून फिरताना दिसतात, ही नक्कीच चांगली बाब आहे. पण अजूनही 30 टक्के लोक मास्क लावत नाहीत. बंधने पाळत नाहीत. तुम्ही तुमच्या जीवाशी खेळू नका, आपल्या आप्तेष्टांच्या जीवाशी खेळू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. आनंदाला थोडे दिवस बंधन घाला. इलाजापेक्षा काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. नागरिकांना वारंवार आवाहन करूनही ते कोरोनाविषयक नियम पाळायला तयार नाहीत. त्यातच ब्रिटनमधील कोरोनाच्या धास्तीने महाराष्ट्र सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. दुसर्या पाळीवरून कामावरून परतणार्या कामगारांचे आणि तिसर्या पाळीवर कामाला जाणार्या कामगारांचे रात्रीच्या संचारबंदीमुळे हाल होणार आहेत.