न्यायलयाच तंबी; समाज माध्यमांवर पोस्ट जपून टाका अहमदनगर / प्रतिनिधी: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त...
न्यायलयाच तंबी; समाज माध्यमांवर पोस्ट जपून टाका
अहमदनगर / प्रतिनिधी: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात माध्यमे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणार्यांनी जबाबदारीने वागावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करून आदेश द्यावा लागेल, अशी तंबी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिली.
या प्रकरणाचे कामकाज सुरू असताना न्यायाधीशांचे लक्ष न्यायालयातील गर्दीकडे गेले. त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी तंबी दिली. प्रसार माध्यमे, सोशल मीडियावर नेटकर्यांनी व्यक्त होताना जपून लिहावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न होता कामा नये, जर असे प्रकार घडले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांची दखल घेऊन योग्य ते आदेश दिले जातील, असेही न्यायालयाने बजावले. आरोपीचे वकील अॅड. महेश तवले यांनी काही कथित समाजसेवक या प्रकरणाबद्दल आणि न्यायालयाबद्दलही सोशल मीडियात वेगवेगळ्या पोस्ट करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर कुठे काही आक्षेपार्ह आढळून आले, तर त्याच्या प्रिंट काढून न्यायालयात सादर करा, अशा सूचना तवले यांना दिल्या.
दरम्यान, बोठे याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. नगरसह अन्य ठिकाणी आतापर्यंत दहापेक्षा जास्त ठिकाणी पोलिसांना शोध घेतला आहे. याशिवाय अन्य पुरावे मिळविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत; मात्र तपासाच्या दृष्टीने सर्वच माहिती उघड करणे शक्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. गुरुवारी दोन ठिकाणी पोलिस पथकाने बोठेच्या शोधार्थ धाडी टाकल्या; मात्र त्या ठिकाणी काहीच आढळून आले नाही. विशेष पथक बोठेच्या शोधार्थ जिल्ह्यामध्ये पाठवले आहे. पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी जरे यांच्या घराची, तसेच या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे व बोठे याच्या घराची झाडाझडती घेतली आहे.
बोठेला विद्यापीठाचा धडा
पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर बाळ बोठेला घेण्यात आले होते. गंभीर गुन्ह्यातील आरोपीला विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या बैठकीला हजर राहता येत नाही. त्यामुळे त्याचे सदस्यत्त्व तसेच त्याची अभ्यासक्रमाला असलेले दोन्ही संदर्भ ग्रंथ काढून घेण्यात आले आहेत. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ही माहिती दिली.