कृषी विभागातल्या दोषी अधिकार्यांचे तात्काळ निलंबन करा राक्षसभुवन येथील शेतकर्याची पोखरा प्रकल्प संचालकांसमोर मागणी बीड । प्रतिनिधीः- पोखरा ...
कृषी विभागातल्या दोषी अधिकार्यांचे तात्काळ निलंबन करा
राक्षसभुवन येथील शेतकर्याची
पोखरा प्रकल्प संचालकांसमोर मागणी
बीड । प्रतिनिधीः-
पोखरा अंतर्गतच्या योजना राबवल्यानंतर कृषी विभागाकडून राक्षसभुवन येथील तरूण शेतकरी बालासाहेब ज्ञानोबा मस्के यांना पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे सदरील शेतकर्याने टोकाचे पाऊल उचलले आणि गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यातील शेतकर्यात संताप व्यक्त होत असतांनाच आज पोखरा विभागाचे संचालक विकास रस्तोगी आणि उपविभागीय अधिकारी टिळेकर यांनी संबंधित शेतकर्याच्या घरी भेट दिली असता गावातील शेतकर्यांनी या अधिकार्यांसमोर बीडच्या कृषी विभागाचे वाभाडे काढत आमचा माणुस केवळ कृषी विभागातील अनागोंदी कारभारामुळेच गेला.
आता तुम्ही पैसे द्याल ते काय कामाचे? जसे आमच्या माणसाने टोकाचे पाऊल उचलले तसे तुम्ही ही आता टोकाचे पाऊल उचला आणि सर्वच कृषी विभागातील दोषी अधिकार्यांना निलंबीत करा अशी मागणी उपस्थित शेतकर्यांनी केली. राक्षसभुवन येथील शेतकरी बालासाहेब मस्के यांनी काल आत्महत्या केल्यानंतर आज सकाळी पोखरा प्रकल्पाचे संचालक विकास रस्तोगी आणि उपविभागीय अधिकारी टिळेकर यांनी आज राक्षसभुवन येथे जावून मस्के कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी गावातील शेकडो शेतकर्यांनी पोखरा अंतर्गत योजना राबवतांना बीडचा कृषी विभाग किती बेजबाबदारपणे वागतो. शेतकर्यांना कसा त्रास देतो याचे पाढेच वाचले. बालासाहेब मस्के हा आपल्या शेतामध्ये नवेनवे प्रयोग करणारा अधोनिक शेतकरी होता. पोखरा अंतर्गत त्याने अनेक योजनात सहभाग नोंदवून त्याचा लाभ तो घेत होता.अगोदर कृषी विभागातले अधिकारी तुम्हाला मंजुरी आहे असे म्हणायचे, त्याने खर्च करून साहित्य घेतले, ट्रॅक्टर घेतले त्यावेळी कृषी विभागातला एक कर्मचारीही सोबत होता. मात्र नंतर तुम्हाला मंजुरी नाही असे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे कृषी विभागाच्या या गलथान कारभारामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलले. पोखरा अंतर्गत गाव असल्याने गावात एखाद दुसर्या मिटिंगसाठी कृषी विभागाचा माणुस यायचा, देवळात बसायचा, बैठक घ्यायचा परंतू शेतकर्यांनी योजना राबवल्यानंतर मात्र त्याचे पैसे त्यांना देत नसायचा. स्थळ पाहणीसाठी बोलवण्यात आल्यानंतरही कृषी विभागाचे अधिकारी येत नव्हते.
उलट तेथूनच तुम्ही स्थळ पाहणी करा आम्ही पैसे काढुन देवू असे म्हणायचे. बीडचा कृषी विभाग अत्यंत बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप या शेतकर्यांनी पोखरा प्रकल्प संचालकांसमोर केला. त्यावेळी संबंधित शेतकर्याला सर्व लाभ मिळून देवू असे उपस्थित अधिकार्यांनी सांगतिल्यानंतर शेतकरी अधिक संतापले. आता तुम्ही पैसे द्याल, ते पैसे काय कामाचे? आमचा माणुस गेला, त्याने केवळ बीडच्या कृषी विभागातील अधिकारी कर्मचार्यांच्या भोंगळ कारभारामुळेच टोकाचे पाऊल उचलले. आता तुम्हीही टोकाचे पाऊल उचला. पोखरा अंतर्गत काम करणार्या बीडमधील कृषी अधिकारी, कर्मचार्यांचे तात्काळ निलंबन करा अशी संतप्त मागणी या शेतकर्यांनी लावून धरली. पोखरा विभागाचे संचालक अन् उपविभागीय अधिकारी या दोघांनीही संतप्त शेतकर्यांच्या भावना शांतपणे ऐकून घेतल्या.
त्या शेतकर्याचे बील दोन दिवसात देवू; दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करू-विकास रस्तोगी कृषी विभागातील अधिकारी-कर्मचार्यांच्या भोंगळ कारभाराला कंटाळून राक्षसभुवन येथील बालासाहेब मस्के या शेतकर्याने काल गळफास घेवून आत्महत्या केली. त्या शेतकर्याचे जे काही बील शासनाकडे अडकले असेल तर दोन दिवसात देवू असे म्हणत या प्रकरणात जो कोणी अधिकारी कर्मचारी दोषी असेल त्यावर कठोर कारवाई करू असे पोखरा प्रकल्प संचालक विकास रस्तोगी यांनी म्हटले. पोखरा संचालकांची जिल्हाधिकार्यांसमवेत बैठक राक्षसभुवन येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेट देवून परतल्यानंतर प्रकल्प संचालक विकास रस्तोगी आणि टिळेकर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचार्यांची बैठक झाली. बीड जिल्ह्यात पोखरा अंतर्गत 150 गावांमध्ये काम चालू आहे. अनेक शेतकर्यांचे पैसे अडकलेले आहेत. या सर्व बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. सदरची बैठक 1 वाजेपर्यंत सुरू होती.