पुणे / प्रतिनिधीः आगामी काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने...
पुणे / प्रतिनिधीः आगामी काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने त्याबाबतची माहिती दिली जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आता याचे प्रत्यंतर येताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभरती होणार आहे.
महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष बाब म्हणजे संतोष बारणे यांच्या पत्नी माया या भाजपच्या नगरसेवक आहेत. त्या भाजपमध्येच राहणार आहेत. फक्त संतोष बारणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या अनोख्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
येत्या पाच जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारणे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या वेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, संतोष बारणे यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली होती. यामुळे आगामी काळात भोसरी मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. पश्चिम बंगालचे भाजप खासदार सौमित्र खान यांची पत्नी सुजाता मोंडल यांनी थेट ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या प्रकारामुळे त्यांचे पती खासदार सौमित्र खान संतापले होते.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर सौमित्र खान यांनी आपल्या पत्नीला तलाकची नोटीस पाठवण्याचा निर्धार केला होता. इतकेच नाही तर खान हे आडनाव वापरू नको, असा दमही सौमित्र यांनी पत्नी सुजाताला दिला होता.