नाशिकरोड/ प्रतिनिधी शाळेची फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासला बसण्यास परवानगी नाकारणाऱ्या शिक्षण संस्थांच्या निर्णयाला महाराष्ट्...
नाशिकरोड/ प्रतिनिधी
शाळेची फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासला बसण्यास परवानगी नाकारणाऱ्या शिक्षण संस्थांच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र विरोध दर्शवित अशा संस्थांची मान्यता रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
फी अभावी विद्यार्थ्यांना काढल्यास आंदोलनाचा इशाराही मनसेने दिला आहे. संघटनेने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेऊन संबंधित शाळांवर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदन देते वेळी मनविसेचे नाशिकरोड अध्यक्ष नितीन धानापुणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शशिकांत चौधरी, उमेश भोई, भाऊसाहेब ठाकरे, रंजन पगारे, गुड्डू शेख, स्वप्नील विभांडीक, जोगित पिल्ले आदी उपस्थित होते. उपासनी यांनी शाळा प्रशासन व पालक यांची बैठक बोलवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पैशांअभावी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नये असा सरकारचा आदेश असतानाही काही मुजोर शाळा फीसाठी तगादा लावत आहेत. खाजगी शिक्षण संस्था इतर वेळी भरमसाठ फी घेतातच पण करोना काळातही फीसाठी पालकांकडे तगादा लावत आहे. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. शाळा बंद असली तरी शिक्षकांचा पगार सोडून इतर कोणताही खर्च नसताना शाळा ऑनलाईन क्लासच्या नावाखाली प्रत्येक संपूर्ण फीसाठी पालकांवर दबाव आणला जात आहे. फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस मधून काढून टाकण्यात येणार असून ज्या विद्यार्थ्यांनी फी भरलेली नाही त्यांनी फी भरावी असा धमकीवजा इशारा देण्यात येत आहे. अशा शाळांचे मागील सर्व तपासून गैरव्यवहार करणा-याशाळांची मान्यता रद्द करावी.अशी या निवेदनात मागणी करण्यात आली आहे.