सुजन फौंडेशनकडून कोल्हापूरमधील एका विशेष सत्काराची आठवण लोणंद / वार्ताहर : कुस्ती क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तीमत्व व देशाचे पहिले हिंद केसर...
सुजन फौंडेशनकडून कोल्हापूरमधील एका विशेष सत्काराची आठवण
लोणंद / वार्ताहर : कुस्ती क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तीमत्व व देशाचे पहिले हिंद केसरी होण्याचा मान मिळविलेले पै. श्रीपती शंकर खंचनाळे यांचे सोमवारी सकाळी वयाच्या 86 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रातून एक हळहळ व्यक्त केली जाते आहे.
गेल्या वर्षी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा हिरक महोत्सवानिमित्त सुजन फौंडेशन आदर्की बु।, ता. फलटण यांच्या वतीने कोल्हापूर येथे श्रीपती खंचनाळे यांच्या घरी जाऊन शाल श्रीपळ देत त्यांचा सत्कार करण्यात आला होता. हा सत्कार खासदार धैर्यशील माने, कुस्तीमित्र संपतराव जाधव यांच्या हस्ते करत असताना श्रीपती खंचनाळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. यापूर्वी ही कुस्तीमित्र श्रीपती खंचनाळे यांची भेटगाठ घेत संपतराव जाधव यांनी कुस्ती क्षेत्रा संबंधित माहिती जाणून घेतली होती. सुजन फौंडेशनच्या आठवणीतील असलेले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे आज हयात नसल्याने त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झालेली आहे. अनेक कुस्तीगीर मल्लांसाठी ते प्रेरक आणि मार्गदर्शक असे होते.
कुस्ती क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल सविस्तर माहिती श्रीपती खंचनाळे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी सांगितली होती. वयाच्या 12 व्या वर्षांपासून ते कुस्ती खेळत होते. त्यांना वयाच्या 26 व्या वर्षी हिंद केसरी मिळाला असून मानाची गदा तात्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वजन हे 140 किलो होते. (पान 1 वरुन) 60 वर्षाच्या कारकिर्दीत हिंद केसरी होण्याअगोदर तसेच नंतरही ते कुस्तीचा संघर्ष हा कोल्हापूरमधील शाहूपुरीच्या तालमीत करत होते. पंजाबच्या मल्लावर विजय मिळवित महाराष्ट्राचा मल्ल असल्याची ओळख समस्त देशाला करून देताना त्यांना महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान वाटला. हिंदकेसरी होण्याचा मान तालीममध्ये केलेल्या सततच्या संघर्षामुळे मिळाला. अशी भावना देशाचे पहिले हिंद केसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांनी व्यक्त केली होती. हिंदकेसरी मिळवल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे घरी 8 दिवस मुक्कामासाठी होते, असेही त्यांनी सांगितले होते. देशाचा मान आणि अभिमान असलेले श्रीपती खंचनाळे यांचा सन्मान गेल्या वर्षी सुजन फौंडेशनला करण्याची संधी मिळाली. याबद्दल फौंडेशनचे अजित जाधव यांनी समाधान व्यक्त केले असून आज ते आपल्यात नसल्याने त्यांच्या प्रती त्यांनी आठवणीतीतील भावना व्यक्त करत भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.
देशातील पहिला हिंदकेसरीचा किताब मिळविणारे श्रीपती शंकर खंचनाळे यांना बरोबर घेऊन पुन्हा इतिहासाला उजाळा देता आला. ज्या मातीने अनेक मल्लांना घडविले. त्याच कोल्हापूरच्या मातीत आम्हांला त्यांच्या सत्काराचे आयोजन करता आले. आज जरी खंचनाळे आपल्यात नसले तरी श्रीपती खंचनाळे यांचे कार्य नव मल्लांना एक नवी प्रेरणा देणारे ठरणारे आहे.
-संपतराव जाधव- कुस्तीमित्र