कोणत्याही राजकीय पक्षात दोन गट असतात; परंतु ते स्थानिक पातळीवर असतात. राज्याच्या पातळीवर नेतृत्व करणार्यांना घरातून आव्हान फारसं कधीच म...
कोणत्याही राजकीय पक्षात दोन गट असतात; परंतु ते स्थानिक पातळीवर असतात. राज्याच्या पातळीवर नेतृत्व करणार्यांना घरातून आव्हान फारसं कधीच मिळत नाही. घर नीट असेल, तर राज्याचं नेतृत्व करता येतं; परंतु घरातूनच राज्याच्या नेतृत्वाचे पाय ओढले जात असतील, तर त्याला राज्याचं नेतृत्व करण्यात अडचणी येतात. चंद्रकांतदादांना आता तो अनुभव येत असेल.
घरात मान तर जगात शान असं म्हटलं जातं. गाव, तालुका, जिल्हा मागं असला, तर राज्याचं नेतृत्व करता येतं. तसं नसेल, तर मग नेतृत्व खुंटतं. त्याला मर्यादा येतात. गाव नाही मागं आणि चालले राज्याचं नेतृत्व करायला असं म्हटलं जातं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाबतीत आता तसं म्हणायची वेळ आली आहे. चंद्रकांतदादा स्वतः पुण्यातील कोथरूड या सुरक्षित मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. यापूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघातून ते दोनदा निवडून आले होते. हा मतदारसंघ मर्यादित मतदारांचा असतो. त्यात सर्व पदवीधर असतात. पदवीधर मतदारसंघाच्या बांधणीवर भाजपनं फार पूर्वीपासून लक्ष दिलं होतं. त्यामुळं तिथं चंद्रकांतदादा निवडून येत. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती, त्यामुळं चंद्रगकांतदादांचं फावलं. नसलेल्या ताकदीच्या जोरावर बेंडकुळ्या फुगवण्याचा प्रयत्न केला, तर जसं हसू होतं, तसंच चंद्रकांतदादांचं विधान परिषदेतील निवडणूक निकालानंतर झालं. विधान परिषदेच्या निवडणुकीत सहाही जागा जिंकू, असा दावा त्यांनी केला. प्रत्यक्षात एकच जागा जिंकता आली, तीही भाजपमुळं नाही, तर व्यक्तिगत अमरिश पटेल यांच्या प्रभावामुळं. पुणे आणि नागपूर या हक्काच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या. त्याअगोदर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजितदादांना पराभूत करण्याचा चंग बांधून तिथं ठाण मांडून बसलेल्या चंद्रकांदादांना तिथं चांगलाच झटका बसला होता. भाजपच्या उमेदवाराला अनामत रक्कम वाचविता आली नव्हती. वारंवार तोंडघशी पडूनही ते आपला हेका सोडायला तयार नाहीत. पुणे पदवीधर मतदारसंघात माजी आमदार मेघा कुलकर्णी यांना दिलेला शब्द ज्यांना पाळता आला नाही, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून भाजपत गेलेल्यांची आता काय अवस्था झाली, हे वेगळं सांगायला नको. यशाला अनेक वाटेकरी असतात. अपयशाला कुणी नसतं, हे आता चंद्रकांतदादांच्या चांगलंच लक्षात आलं असेल. विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून एक महिना झाला नाही, तोच त्यावरून चंद्रकांतदादांना स्वकीयांनीच घेरलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांचे सूर चांगलेच जुळले असले, तरी या दोघांच्या विरोधात भाजपत एक गट तयार झाला आहे. त्याचा आवाज आतापर्यंत काहीसा क्षीण होता; परंतु आता त्याला कुठं धार यायला लागली आहे. एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप सोडला. पंकजा यांना राष्ट्रीय सचिव करण्यात आलं असलं, तरी त्यांची नाराजी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी दिसलीच आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातही भारतीय जनता पक्षातील गटबाजीचा तेथील उमेदवाराला फटका बसला. 1958 नंतर तिथं प्रथमच कमळ सुकलं आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. या पार्श्वभूमीवर अजूनही फडणवीस यांचा चंद्रकांतदादांवर विश्वास आहे. त्यांच्यावर टीका करणारे मला माहीत नाहीत, असं सांगून फडणवीस यांनी त्यांना दुर्लक्षिले असलं, तरी आता त्यांचा आवाज राज्यात दूरपर्यंत गेला आहे.
पुणे पदवीधर व व शिक्षक मतदारसंघात भाजपच्या झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. नाराज पदाधिकार्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य केलं असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगले तालुक्याचे माजी अध्यक्ष पी. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत चंद्रकांतदादांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपचा ज्या पद्धतीनं पराभव झाला, तो पक्षातील व परिवारातील जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनाला लागला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील व जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे या दोघांवर निवडणुकीची जबाबदारी होती; मात्र या दोघांनीही ही निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही. बाहेरून आलेल्या पदाधिकार्यांवर विसंबून राहून एकतर्फी विजय होईल, अशा भ्रमात ते राहिले. त्यांनी ही निवडणूक व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळंच भाजपचा एवढ्या मोठ्या फरकानं पराभव झाला,’ असा आरोप भाजपच्या पदाधिकार्यांनी केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही ही मागणी करत आहोत, असं या वेळी शिवाजी बुवा व पी. डी. पाटील यांनी सांगितलं. मागील विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढवली. त्यामुळं या वेळी संग्राम देशमुख यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. बाहेरून आयात केलेल्या उमेदवारामुळं सत्ता येत नाही, याचा अनुभव विधानसभेच्या निवडणुकीत येऊनही त्यापासून भाजप धडा घ्यायला तयार नाही. आताही देशमुख यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी मोठ्या फरकानं पराभव केला. अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पराभव झाल्यानं आता पक्षनेतृत्वाविरोधात धुसफूस सुरू झाली आहे. या वादात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनीही उडी घेतली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप विरोधात तीन पक्ष उतरल्यानं भाजपचा पराभव झाला. राजकारणात हार-जीत होत राहणारच. फक्त निवडणुकीचं निमित्त पुढं करून ज्यांना पक्षामध्ये कोणतंही फारसं महत्त्वाचं स्थान नाही, अशा लोकांनी चंद्रकांतदादा यांचा राजीनामा मागणं हस्यास्पद आहे’, असा टोला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी लगावला आहे. यातून भारतीय जनता पक्षातील दुफळी बाहेर आली आहे. चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्राभात भाजपला 105 जागा मिळाल्या, असं फडणवीस सांगत असले, तरी ज्या सांगली-कोल्हापूर पट्ट्यातून चंद्रकांतदादा आले, त्या पट्यात भाजपला किती जागा मिळाल्या, हे एकदा त्यांनी जाहीर करायला हवं. त्यातून त्यांची कर्तबगारी, संघटन कौशल्य दिसलं असतं.
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात अनेक निवडणुकांत भाजपला यश मिळालं. राज्यातील विविध पक्षांतील मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेत विजय संपादन केला. एकूणच भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेला हे खरं आहे; परंतु त्याचा आणि चंद्रकांतदादांचा काय संबंध हे ना फडणवीस सांगू शकले ना महेश जाधव. बिहार विधानसभा निवडणूक, विधान सभेच्या पोटनिवडणुकांत मिळालेलं यश, हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं मारलेली मुसंडी नक्कीच कौतुकास्पद आहे; परंतु महाराष्ट्रात भाजप होत्या, तेवढ्याही जागा राखता आल्या नाहीत.
सतत कार्यरत राहून संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचं संघटन वाढवण्यासाठी दादा सदैव प्रयत्नशील आहेत. भाजपच्या विरोधातील सर्व पक्षांना खिळखिळे करण्याचं काम त्यांनी केलं आहे. ’ज्या झाडाला फळं येतात, त्याच झाडाला दगड मारले जातात’ या म्हणीप्रमाणं काहीही झालं, तरी उठसूट चंद्रकांतदादांवर आरोप केले जातात. यातून महाराष्ट्रात त्यांचं स्थान किती मोठं आहे हेच दिसून येतं, असं जाधव यांचं म्हणणं त्यांची चापलुसी करण्यातलं आहे. महाराष्ट्रातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष इथपासून बूथ अध्यक्षांपर्यंत सर्वजण प्रदेशाध्यक्षांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. दोन चार फुटकळांनी केलेल्या आरोपामुळं चंद्रकांतदादांचं महत्त्व कमी होणार नाही, असं जाधव म्हणत असतील, तर अशा दोन-चार फुटकळांकडं दुर्लक्ष करणं किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस ते किंवा प्रदेशाध्यक्ष का दाखवित नाहीत, या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. या निमित्तानं भाजपमधील गृहकलह उफाळून आला आहे.फडणवीस यांनी तातडीनं यावर प्रतिक्रिया देत संबंधितांना फटकारलं आहे. राजीनामा मागणारे कार्यकर्ते कोण आहेत हे मला माहीत नाही, असं सांगताना फडणवीस यांनी चंद्रकांतदादांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. एखादी निवडणूक हरल्यावर अशी मागणी पक्षात कुणी करत असेल तर ते पक्ष शिस्तीत बसणारं नाही, असं फडणवीस सांगत असतील, तर त्यांचे हात कुणी धरले आहेत. पक्षशिस्तीची भाषा बोलणार्या फडणवीस आणि चंद्रकांतदादांकडं नगर जिल्ह्यातील पराभूत आमदारांनी पक्षशिस्त मोडून कसं आपल्याला पाडण्यात आलं आणि त्यात खासदार-आमदार विखे पिता-पुत्राचा कसा हात होता, हे वर्षभरार्पूवी सांगूनही तिथं काय कारवाई केली, हे ते दोघंही सांगायला तयार नाहीत. भाजपात अंर्तगत वादाला खतपाणी घालण्याचं, त्याकडं दुर्लक्ष करण्याचं काम असंच चालू राहिलं, तर भाजपची काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही.