मुंबई / प्रतिनिधीः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाली आहे का, हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे....
मुंबई / प्रतिनिधीः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाली आहे का, हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. याचे महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे त्यांनी केलेले ट्विट. खडसे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आज आपण ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचे म्हटले होते; पण आता त्यांनी आपण 14 दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप आल्याने आपण कोरोनाची चाचणी केल्याचंही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ईडी कार्यालयात जाण्याऐवजी 14 दिवस विश्रांती घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एक ट्विट करुन त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
या आधी नोव्हेंबर महिन्यातही खडसे यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना उपचारांसाठी मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळीही त्यांनी ट्विट करून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसेच संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असेही आवाहन केले होते. खडसे हे ईडी कार्यालयात आलेल्या नोटीशीमुळे जाणार होते; मात्र ते रद्द करत त्यांनी 14 दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय वैद्यकीय सल्ल्यामुळे घेतला आहे. खडसे यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
तीन दिवसांपूर्वीच खडसे यांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर आपण ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. पुण्यातील भोसरी या ठिकाणी असलेल्या भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री आणि खडसे यांना नोटीस बजावली. त्यानंतर आपण 30 डिसेंबरला मुंबईतल्या ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते; मात्र आज त्यांना थंडी, ताप, सर्दी आणि थोडा खोकला येऊ लागला. ही कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही; मात्र त्यांना 14 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आपण ईडी कार्यालयात 14 दिवसांनी हजर राहू असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.