नागपूर : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आज ...
नागपूर : कोरोना साथीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आज प्रत्येकी 50 लाखांचा सानुग्रह सहायता निधी (विमा कवच) देण्यात आला. राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पदुम व क्रीडामंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सानुग्रह धनादेश कुटुंबियांना देण्यात आला.
कोरोना साथीच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊनसह विविध निर्बंध असताना शासकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. वैद्यकीय यंत्रणा, पोलीस विभागाचे कर्मचारी यांच्यासोबतच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे कर्मचारी गावागावांमध्ये झटत होते. यापैकीच नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत समिती नागपूर येथील विस्तार अधिकारी दिलीप कुहीटे, तसेच हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणार्या ग्रामपंचायत डिगडोह ग्रामपंचायतीचे कर्मचारी मज्जिद शेख यांचे कोरोनामुळे निधन झाले. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आदेशानुसार कोविड संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणार्या कर्मचार्यांना विमा कवच लागू केले होते. यामध्ये ग्रामविकास विभागामार्फत अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या तसेच जिल्हा परिषद आस्थापनेवरील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी यांच्यासाठी 50 लाख रुपयांचे विमा कवच निर्धारित करण्यात आले होते. शासनाच्या 8 सप्टेंबरच्या आदेशानुसार सातारा, भंडारा, अहमदनगर, पुणे, ठाणे, रायगड, सांगली, जळगाव, कोल्हापूर, नागपूर व अमरावती जिल्ह्यातील 17 कर्मचार्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या या धोरणामुळे प्रत्येकी 50 लाख रुपयांचे विमा विमा कवच सतत सानुग्रह सहाय्य मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या या दोन कर्मचार्यांच्या कुटुंबियांचे वारस श्रीमती अर्चना कुहिटे, श्रीमती आशिया मस्जिद शेख यांना आज सानुग्रह निधीचा धनादेश देण्यात आला. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी या कुटुंबाच्या सदस्यांशी संवाद साधला.