सीहोर : भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत आल्या आहेत. प्रज्ञा ठाकूर यांनी धर्मशास्त्राचा हवाल...
सीहोर : भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत आल्या आहेत. प्रज्ञा ठाकूर यांनी धर्मशास्त्राचा हवाला देत म्हटले आहे की, जेव्हा आपण एखाद्या क्षत्रियाला क्षत्रिय म्हणतो, त्यावेळी त्याला वाईट वाटत नाही. जर आपण एखाद्या ब्राम्हण व्यक्तीला ब्राम्हण म्हटलं तर त्याला वाईट वाटत नाही. जर वैश्य समाजातील लोकांना वैश्य म्हटले तर त्यांना वाईट वाटत नाही. परंतु, जर आपण एखाद्या शुद्राला शुद्र म्हटले तर त्यांना वाईट वाटते. कारण काय आहे? कारण त्यांना गोष्टी कळत नाहीत. मध्य प्रदेशच्या सीहोरमध्ये एका क्षत्रिय संमेलनात बोलताना त्यांनी वर्ण व्यवस्थेवरुन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
प्रज्ञा ठाकूर यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, त्यांना वेड लागलं आहे. ठाकूर म्हणाल्या की, त्या (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) वेड्या झाल्या आहेत. त्यांची तळमळ होत आहे. त्यांनी समजून घेतले पाहिजे की, जिथे त्या राज्य करत आहेत, तो भारत आहे. पाकिस्तान नाही. प्रज्ञा ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, त्या (ममता बॅनर्जी) हताश झाल्या आहेत. कारण त्यांना वाटत आहे की, त्यांचे सरकार बरखास्त होणार आहे. ठाकूर यांनी दावा केला आहे की, पुढील विधानसभा निवडणूकांनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शासन येईल आणि तिथे हिंदू राज सुरु होईल. प्रज्ञा ठाकूर यांच्यासाठी नवनवे वाद निर्माण करणे ही काही नवी गोष्ट नाही. याआधीही त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आपल्या भडकाऊ भाषणांसाठी त्या नेहमीच ओळखल्या जातात. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन सुनावलं होतं. परंतु, तरिदेखील प्रज्ञा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे थांबवले नाही.