केंद्र सरकारचे राज्यांना आदेश; कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना नवी दिल्लीः केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना नव्या वर्षाच्य...
केंद्र सरकारचे राज्यांना आदेश; कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना
नवी दिल्लीः केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना नव्या वर्षाच्या जल्लोषासाठी होणार्या कार्यक्रमांवर कडक निगराणी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा घटना कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरण्यासाठी संभाव्य सुपर स्प्रेडर्स असल्याचे सिद्ध होऊ शकतात. कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी शासन स्तरावरही मोठे प्रयत्न केले जात आहेत. हिवाळ्याच्या मोसमात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंत्रालयाने आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की गेल्या साडेतीन महिन्यांपासून देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या बाबतीत तीव्र घट झाली. युरोप आणि अमेरिकेत साथीच्या आजाराच्या घटनांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीचा विचार करता देशात सखोल खबरदारी घेण्याची आणि कठोर पाळत ठेवण्याची गरज आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हिवाळा हंगामाच्या अनुषंगाने ‘सुपर स्प्रेडर’ इव्हेंट्स आणि गर्दी होणार्या ठिकाणांचे काटेकोर निरीक्षण करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिवांचे म्हणणे आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा पुनरुच्चार केला.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या मूल्यांकनानुसार रात्रीच्या वेळी प्रतिबंधात्मक आदेशासारखे स्थानिक निर्बंध लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांत किंवा एका राज्यातून दुसर्या राज्यात प्रवासी आणि वस्तूंच्या वाहतुकीवर कोणतीही बंधनं घातलेली नाहीत. राज्यांचे लक्ष वेधून घेण्याचा आरोग्य सचिवांनी त्यांना आग्रह केला. स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून 30 डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत योग्य ती कारवाई करू शकतात.
रात्री 11 नंतर हॉटेल, पब्स, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. याचा अर्थ तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही, असे नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांकडे किंवा नातेवाइकांकडे जायचे असेल तर रात्री 11 नंतर जाऊ शकता. फक्त सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे व्यवस्थित पालन करावे. हिल स्टेशनला गर्दी होते, ही गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ठाण्यात अनोखी सुविधा
थर्टीफस्ट आणि राज्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत असलेली संचारबंदी यामुळे तळीरामांचा आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणार्यांचा हिरमोड झाला आहे; मात्र त्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी अनोखी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. हवी तेवढी घ्या आणि सुरक्षित घरी जा.. असे या सुविधेचे नाव आहे. या सुविधेतंर्गत मद्यपींना वाहन आणि वाहन चालकाची सुविधा दिली जाणार आहे.