नवी दिल्ली : सर्वसाधारणपणे तांत्रिक विकासाला बरेचदा व्यत्यय म्हणून संबोधित केले जाते. परंतु, यावर्षी कोरोना साथरोगाच्या संकट काळात तंत्रज्...
नवी दिल्ली : सर्वसाधारणपणे तांत्रिक विकासाला बरेचदा व्यत्यय म्हणून संबोधित केले जाते. परंतु, यावर्षी कोरोना साथरोगाच्या संकट काळात तंत्रज्ञान विकासाची मोठी मदत झाली. तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोनामुळे आयुष्यात आलेले अडथळे दूर करण्यास मदत मिळाल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ते बुधवारी डिजिटल इंडिया पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की, भारताने केवळ गतिशीलता-निर्बंधाचा प्रतिकूल परिणाम कमी केले नाहीत तर विविध क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी या संकटाचा उपयोग संधी म्हणून देखील केला. अलिकडच्या काही वर्षांत डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत केल्यामुळेच हे शक्य झाले. ते म्हणाले की बहुतांश संस्थांनी ऑनलाईन वर्ग सुरु केल्याने विनाअडथळा शिक्षण सुरूच राहिले. न्यायव्यवस्थेपासून टेलिमेडिसीनपर्यंत अनेक क्षेत्रं आभासी पद्धतीने आपले कामकाज करत आहेत. नागरिकांना विविध सेवा देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेची चाके निरंतर फिरत ठेवण्यासंदर्भात सरकारसाठी देखील माहिती तंत्रज्ञान हे सर्वात महत्त्वपूर्ण साधन होते असे कोविंद यांनी स्पष्ट केले.