अकलूज : हातात तलवार आणि कुऱ्हाड घेऊन फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे अकलूजच्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. माळशिरस तालु...
अकलूज : हातात तलवार आणि कुऱ्हाड घेऊन फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे अकलूजच्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूजच्या सात तरुणांना पोलिसांनी चांगलाच घडा शिकवत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
माळशिरस तालुक्यातील सात तरुणांना पकडून अकलूज पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर कलम 4/25 व मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पिसेवाडी येथील शहाजी इंगळे, दीपक भाकरे, शैलेश भाकरे, महेश भाकरे, सागर चव्हाण, सतीश इंगळे आणि समाधान भाकरे या सात जणांनी हातामध्ये तलवार सुरी, लाकडी दांडके घेऊन फोटो काढले होते आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले होते.
सात तरुणांनी एकसाथ हातात शस्त्र घेऊन ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या सात पोरांचा नेमका इरादा काय होतं? हातात शस्त्रं घेऊन त्यांना नेमकं काय करायचं होतं? असे प्रश्न उपस्थित झाल्याने पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. या तरुणांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच अकलूज पोलिसांनी ताबडतोब तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. या सर्व तरुणांवर कलम 4/25 व मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
काही तरुण सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी नसते उद्योग करतात. अशाच प्रसिद्धीच्या मानसिकतेतून तसंच ‘हवा’ करण्यासाठी काही तरुण सोशल मीडियावर हातात शस्त्र घेऊन फोटो पोस्ट करत असतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसंच दहशत माजवणाऱ्या पोरांना धडा शिकवण्याचं आव्हान पोलिसांवर आहे.