बहुतांश शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही बीड । प्रतिनिधीः- अिरिक्त पावसामुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रम...
बहुतांश शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही
बीड । प्रतिनिधीः-
अिरिक्त पावसामुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयांचे अनुदान दिले. हे अनुदान जवळपास शंभर टक्के वाटप केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो, तशी आकडेवारीही दाखविली जाते मात्र बहुतांश शेतकर्यांच्या तक्रारी आहेत की, आमच्या खात्यावर अद्याप एक रुपयाही पडलेला नाही. मग शेतकरी खोटे की, प्रशासन खोटं? असा प्रश्न उपस्तित होत आहे.
परतीच्या पावसाने राज्यामध्ये धुमाकूळ घातला होता. यात बाजरी, कापूस, सोयाबीन, ऊस, मूग, उडीद इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने शेतकर्यांसाठी हेक्टरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली. दिवाळीला पैसे खात्यावर पडतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दिवाळीनंतरही पंधरा दिवसांनी शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते. आता प्रशासन शंभर टक्के पैसे शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगत आहे. त्या पद्धतीची आकडेवारीही प्रकाशीत करण्यात आलेली आहे. मात्र बहुतांश शेतकर्यांच्या तक्रारी आहेत की, आमच्या खात्यावर एक रुपयाही पडलेला नाही. यामध्ये शेतकरी खोटे बोलतात की, प्रशासन खोटं आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ दिशाभूल करण्याच्या उद्देशाने शंभर टक्के अनुदान वाटप केल्याचा दावा तर केला जात नाही ना, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.