लोणंद / वार्ताहर : नवे पर्व, बहुजन सर्व असा नारा देत बहुजन एकजुटीचा मंत्र हाती घेऊन खंडाळा तालुका बहुजन हक्क समितीच्या वतीने तालुक्यात बहुज...
लोणंद / वार्ताहर : नवे पर्व, बहुजन सर्व असा नारा देत बहुजन एकजुटीचा मंत्र हाती घेऊन खंडाळा तालुका बहुजन हक्क समितीच्या वतीने तालुक्यात बहुजन समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न होत असताना आज तालुक्यातून मोठया प्रमाणात बहुजन आरक्षणाची बचाव मोहीम राबविली जाते आहे.
समस्त बहुजन समाजातील एकत्रित आलेल्या समाज घटकाकडून तयार झालेल्या बहुजन हक्क समितीकडून बुधवार, दि.9 डिसेंबर रोजी खंडाळा येथे बहुजन आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक गावातून विविध समाज घटकांशी भेटी घेत त्यांना यांमध्ये सहभागी होण्यासाठी समितीच्या वतीने संवाद साधला जात आहे. हा संवाद नव्हे तर समस्त बहुजन समाज एकीने लढण्यासाठी उभा केला जात आहे. आज हा संवाद अंतिम टप्प्यात आलेला असून बहुजन समाजाच्या बैठका घडवून आणत असताना त्यातून संवाद साधल्याने आपल्या हक्काच्या लढाईसाठी समितीस समाज बांधवांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे आज तालुक्यातील गावांमध्ये या बहुजन मोर्चाची चर्चाच चर्चा होते आहे.
बैठकीतून अनेक सकारात्मक आणि प्रेरणादायी तसेच मोर्चाला पाठींबा देणारी मनोगते व्यक्त केली जात आहेत. पळशी येथील बैठकीमध्ये नंदीवाले समाजातील एका व्यक्तीने केलेले मनोगत महत्त्वपूर्ण होते. कुणाला आहारी न पडता मोर्चामध्ये एकजुटीने सहभागी व्हा. या मनोगताची विशेष चर्चा झाली. एकजुटीचा नारा देत असताना त्यांनी एका उदाहरणातून निस्सिम आणि प्रामाणिक भक्तीच्या विजयाला किती प्राधान्य असते. हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. राजा, भक्त कुंभार आणि विठ्ठलाचे उदाहरण देत असताना आपण 9 डिसेंबर रोजीच्या मोर्चाला एकजुटीने आले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
आपण एकजुटीने येणार्या 9 डिसेंबरला कुणाला बळी न पडता आहारी न जाता एखादा म्हणेल की, तू कशाला जातो. ह्याच्या पासून तुला काय फायदा आहे. यावर ही विचार मंथन अगदी रांगड्या भाषेत केले. तालुक्यातील अनेक गावामध्ये बैठक होत असताना बहुजन हक्क परिषद हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तयारीला लागली आहे. सामाजिक संघटनासह राजकीय संघटना ही या मोर्चात सहभागी होत असून या मोर्चाला आपलाच मोर्चा समजून समर्थन दिले जाते आहे. मी येतोय तुम्ही पण या अशी साद ही घातली जाते आहे. तालुक्यातील अनेक समाज घटकांतील महिला ही या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मोर्चास वाढता पाठींबा आणि समस्त बहुजन समाजाची झालेली एकजूट यांमुळे खंडाळा तालुक्यात या मोर्चाची मोठी चर्चा होती आहे.