लंडन/ मुंबई ः जगातील काही देशांमध्ये नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यास सुरुवात झालेली असताना, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन स्ट्रेन ...
लंडन/ मुंबई ःजगातील काही देशांमध्ये नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यास सुरुवात झालेली असताना, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन स्ट्रेन सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन कोरोनावरही लस प्रभावीपणे काम करू शकते. घाबरण्याचे काहीच कारण नाही, असा दिलासा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
कोरोना विषाणूचा जो मूळ प्रकार आहे, त्यापेक्षा या नव्या स्ट्रेनमुळे 70 टक्के अधिक संक्रमण होऊ शकते, असे म्हटले जाते. खबरदारी म्हणून अनेक देशांनी आधीच आपल्या सीमा बंद केल्या आहेत. ब्रिटनमधून येणार्या विमानांना बंदी घातली आहे. कोरोनाचा हा जो नवीन स्ट्रेन आहे, त्याला शास्त्रज्ञांनी व्हीयूआय 202012/01 असे नाव दिले आहे. कोरोना विषाणूमध्ये जे परिवर्तन होत आहे, त्यामुळे लस दिल्यानंतर प्रत्येकाच्या प्रतिसाद देण्यावर परिणाम होईल का, या प्रश्नावर शास्त्रज्ञांनी हे अशक्य असल्याचे उत्तर दिले. मानवी शरीराला विषाणूची लागण झाल्यानंतर त्यामध्ये अनेक बदल होत असतात. हे अनपेक्षित नाही आणि त्यामुळे चिंता करण्याचीही आवश्यकता नाही असे शास्त्रज्ञ सांगतात.
वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग म्हणाले, की अनेक कोरोना प्रतिबंधक लसींची निर्मिती अँटीबॉडीज निर्मितीच्या उद्देशाने करण्यात आली आहे. जेणेकरुन, या अँटीबॉडीज कोरोना विषाणूतील स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करतील. लस स्पाइकमधील वेगवेगळया भागांना लक्ष्य करते. त्यामुळे तिच्यात एखादे परिवर्तन झाले म्हणून लस उपयोगी ठरणार नाही, असे म्हणता येणार नाही. लसीमध्ये अँटीबॉडीज सारखा काही पैलूंमध्ये फरक असू शकतो; पण म्हणून लस निष्क्रिय ठरेल असा अर्थ काढू शकत नाही. विषाणूत परिवर्तन झाले, तरी लस तितकीच प्रभावी ठरू शकते. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असे सीएसआयआर महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले.
ब्रिटनमध्ये सापडलेल्या संसर्गजन्य कोरोना विषाणूचा नवा प्रकार जीवघेणा असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, अशी दिलासादायक माहिती अमेरिकेतील भारतीय वंशाचे महाशल्यचिकित्सक विवेक मूर्ती यांनी दिली. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी याच महिन्यात महाशल्यचिकित्सकपदी मूर्ती यांची नियुक्ती जाहीर केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार सापडला असून तो जास्त संसर्गजन्य आहे. जास्त संसर्गजन्य असला, तरी विषाणूचा हा प्रकार सर्वात घातक किंवा जीवघेणा असल्याचे पुरावे नाहीत, असे मूर्ती यांनी एका मुलाखतीत सांगितले. कोरोनावर आता लसी उपलब्ध आहेत. त्या लसी नवीन प्रकारच्या विषाणूवर परिणामकारक ठरणार नाहीत असे मानण्याचे कुठलेही कारण नाही, असे ते म्हणाले. मुखपट्टी लावणे व सामाजिक अंतर पाळणे हेच दोन उपाय त्यावर आहेत, त्यातून या विषाणूचा प्रसार रोखला जाईल असे मूर्ती यांनी सांगितले.
भारतात रुग्णसंख्येत लक्षणीय घट
कोरोना संकटाचा सामना करणार्या भारतीयांना दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19 हजार 556 रुग्ण आढळले आहेत. सहा महिन्यात पहिल्यांदाच भारतात 20 हजारांहून कमी रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतात सध्याच्या घडीला एक कोटी 75 लाख 116 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 302 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत रुग्णांची संख्या एक लाख 46 हजारांवर पोहोचली आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 95.53 टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.45 टक्के इतके आहे.