बीड। प्रतिनिधीः मायबाप सरकार मी आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी लिहून एका तरूण 40 वर्षीय शेतकर्याने आपल्या राक्षसभुवन शिवारात गळफास घेवून आत्मह...
बीड। प्रतिनिधीः
मायबाप सरकार मी आत्महत्या करत आहे अशी चिठ्ठी लिहून एका तरूण 40 वर्षीय शेतकर्याने आपल्या राक्षसभुवन शिवारात गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना राक्षसभुवन येथे रात्री घडली. मयत शेतकर्याने कृषी विभागांतर्गत पोखरा योजनेतून पावर वीडर खरेदी केले. शेतात शेत तलाव खोदून त्यात अस्तरीकरण केले. मत्स पालनासाठी खर्च केला एकूणच शेतीतील या खर्चामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. कृषी विभागाने याचा एक रूपयाही दिला नाही. त्यामुळे शेवटी नैराश्येत येवून शेतकर्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.
बालासाहेब ज्ञानोबा मस्के (वय 40) या शेतकर्याने राक्षसभुवन शिवारात गळफास घेवून आत्महत्या केली. सदरील शेतकर्याने पोखरा योजनेतून पावर वीडर खरेदी केले होते. त्याचबरोबर अन्य इतरही काही खर्च आपल्या शेतीमध्ये केला होता. त्याचे पैसे कृषी विभागाकडून देण्यात आले नव्हते. वेळोवेळी तगादा लावूनही पैसे मिळत नसल्याने शेवटी नैराश्येतून रात्री शेतकर्याने टोकाचे पाऊल उचलले. शेतकर्याने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, मायबाप सरकार मी आत्महत्या करत आहे. मी एक शेतकरी असून शेती परवडत नाही म्हणून मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. पोखरा योजनेतून पावर वीडर घेतले. त्याचे पैसे आठ महिने झो अद्याप मिळाले नाही. शेततळे अस्तरीकरण केल्याचे पैसे मिळाले नाही. गोड्या पाण्यातील मत्स पालन केले त्याचे पैसे मिळाले नाही. त्या सर्व गोष्टींना पैसे खर्च करून मी कर्जबाजारी झाल्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे कळावे आपला एक शेतकरी अशा पद्धतीची चिठ्ठी या शेतकर्याने लिहून ठेवली असून पुढे चिठ्ठीत म्हटले आहे की, प्रिय बंधु नाना व अप्पा माझे दोन मुले व तुमच्या दोन मुलांचा सांभाळ जशा करतात त्याप्रकारे माझ्या मुलांचा सांभाळ करावा मला माफ करा एवढी अपेक्षा असा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेला आहे. दरम्यान घटनेची माहिती पिंपळनेर पोलीसांना झाल्यानंतर पिंपळनेर ठाण्याचे अवताड, सानप यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व शेतकर्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी आपल्या ताब्यात घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये करण्यात आले.