जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया काही दिवसांच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात उत...
जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया काही दिवसांच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत, तर अनेक इच्छूक देखील नगरसेवक होण्यासाठी रणनिती आखतांना दिसून येत आहे. मात्र विद्यमान नगरसेवकांनी नेमका कुणाचा विकास केला असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करु लागले आहे. प्रभागाचा तर विकास झाला नाही, मग नगरसेवकांनी स्वतःचा विकास कसा साधला, याचीच चर्चा जामखेडमध्ये सुरु आहे.
जामखेड नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया 2020-21 सुरू आहे. अनेक इच्छूकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र 30 डिसेंबरनंतरच प्रत्यक्षात कोण कोण रिंगणात आहेत, ते स्पष्ट होणार आहे. जामखेड नगरपरिषद स्थापनेपासून त्रिशंकू पक्षाची सत्ता राहिली. पाच वर्षात माजी राज्यमंत्री आ. सुरेश धस ,माजी कॅबिनेटमंत्री राम शिंदे तसेच विद्यमान आमदार रोहित पवार अशा मातब्बरांचे वर्चस्व नगरपरिषदवर राहिले. या काळात आळीपाळीने वेगवेगळ्या गटांनी नगरपरिषदच्या पदाधिकारी पदावरून स्वतःचा विकास कसा केला जनतेने पाहिला आहे. आमदार सुरेश धस यांनी सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र आणली. सत्तेसाठी कॅबिनेट मंत्री असतांना राम राम शिंदे यांनी शिवसेना सोडून देत सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडून स्वतः कडे जोडले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्तेसाठी पक्षादेश डावलून भाजपच्या म्हणजे माजी मंत्री राम शिंदे यांच्या वळचणीला गेले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ पदाधिकार्यांनीच आतुन परवानगी दिल्याची चर्चा आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी दिलेल्या कोट्यावधी निधीचा विनियोग कोठे झाला? शहरात मूलभूत सुविधां आहेत का? जे काम झाली ती दर्जेदार झाली का? हे प्रश्न जनतेने नगरसेवकांना विचारले पाहिजे. प्रभागापेक्षा काही नगरसेवकांचा विकास कसा झाला हे नागरिकांनी डोळसपणाने पाहण्याची खर्या अर्थाने गरज आहे. भरघोस निधीप्रमाणे जामखेडकरांच्या डोळ्यात मावेना एवढा भरघोस विकास केला तो फक्त कागदावरच. विधानसभेत राम शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर नगरपरिषदच्या पदाधिकारी बदलासाठी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पून्हा सत्ता टिकवण्यासाठी नगरपरिषदेच्या त्या गटाने शहरविकासाच्या गोंडस नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या वळचणीला गेले. कोलांट्या मारत आळीपाळीने सत्तेत राहुन सर्व नगरसेवकांनी विकास केला मात्र स्वतःचा की प्रभागाचा याचा नागरिकांनी डोळसपणे विचार करावा तेच नगरसेवक पुन्हा मतांचा जोगवा मागण्यासाठी येतील तेव्हा त्यांना जनतेने जाब विचारण्याची गरज आहे.