स्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश; विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया घटनास्थळी दाखल इस्लामपूर / प्रतिनिधी : बस्तवडे (ता. तासगाव) येथे र...
स्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश; विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया घटनास्थळी दाखल
इस्लामपूर / प्रतिनिधी : बस्तवडे (ता. तासगाव) येथे रविवारी झालेल्या भीषण स्फोट प्रकरणी जमीन मालक, ठेकेदार व उपठेकेदार अशा आठ जणांविरुध्द तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सपोनि नितीन तात्याजी केराम (वय 41) तासगाव पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, बस्तवडे (ता. तासगाव) येथे रविवारी झालेल्या दोन ब्लास्टिंग ट्रक यांच्या स्फोटात 2 तरुणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिले आहेत. तपासाबाबत पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे गट नंबर 377 येथे रविवारी स्फोट झाल्याची माहिती बस्तवडे येथील शहाजी पाटील यांनी पोलिसांना दिली. याठिकाणी संभाजी चव्हाण यांचे पटवर्धन खोरा परिसरात डोंगर फोडून जमीन सपाटीकरणाचे काम सुरू होते. त्याठिकाणी असणार्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले होते. सपाटीकरणाचे काम ठेकेदार मोहन जंगम या सांगलीच्या बड्या ठेकेदाराला दिले होते. जंगम याने हे ब्लास्टिंगचे काम स्फोटात ठार झालेला प्रतीक स्वामी (रा. नागज) यांना दिले होते.
प्रतीक भुसुरुंग मारताना तो दोन ट्रकमधील काप्रेसर आणि मशिनरी हाताळत होता. त्यासाठी त्याने ब्लास्टिंगसाठी लागणारे साहित्य जिलेटीन आणि डीटोनेटर हे ट्रकमधेच ठेवले होते. यावेळी भुसुरूंगाचे ड्रीलीग मशीन गरम होऊन त्यातून स्फोटाची मालिका सुरू झाली. रविवारी दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास सपाटीकरणाच्या ठिकाणी जिलेटिनच्या कांड्याचा स्फोट होण्यास सुरुवात झाली. हे स्फोट सुमारे दीड तास सुरु होते. सपाटीकरणाच्या ठिकाणी स्फोटके वापरण्याचा परवाना नसताना त्याठिकाणी स्फोटकाचा वापर करून ब्लास्टिंग करण्यासाठी बेकायदेशीर ठेका दिला. बेकायदेशीर रित्या उत्खनन करण्यासाठी स्फोटकाचा वापर केला. यातील संशयित जमीन मालक संभाजी चव्हाण व इतर सात जणांनी बेकायदेशीर रित्या स्फोटकांचा वापर करणेस आणि साठा करण्यास संमती दिली.
बेकायदेशीर रित्या स्फोटके वापरण्यास आणि साठा करण्यास प्रेरणा दिली. बेकायदेशीर व अवैध रित्या या सपाटीकरण कामासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रकमधील कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन प्रतीक मनमत स्वामी (वय 22, रा. नागज, ता. कवठेमहांकाळ) व ईशवर गोरख बामणे (वय 22, रा. आजूर, तालुका अथणी) या दोघांच्या मृत्यूस व महेश शिवाप्पा दुडनवार (वय 25, रा. आजूर, ता. अथणी, जिल्हा बेळगाव) व उपेंद्र यादव (रा झारखंड) यांना गंभीर जखमी केल्याच्या कारणावरून तसेच भारतीय स्फोटकाचा अधिनियमातील तरतूदीप्रमाणे संभाजी सदाशिव चव्हाण, मनीषा संभाजी चव्हाण, संग्रामसिंह संभाजी चव्हाण, पृथ्वीराज संभाजी चव्हाण, अपक आई मनीषा, (सर्व रा, सिध्देवाडी) ता. तासगाव ठेकेदार मोहन कलैया जंगम (रा. नेमिनाथनगर सांगली), प्रतीक मनमत स्वामी (रा. नागज, ता. कवठेमंहकाळ) ईश्वर बामणे, महेश शिवाप्पा दुडणवार या आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून या स्फोटाचा तपास सुरू असून घटनास्थळावर 13 वेगवेगळे नमुने पोलिसांनी पुढील तपासासाठी घेतले आहेत. जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. या कांड्या कोठून आणल्या. याचा परवाना आहे का? यासह जमीन सपाटीकरणासाठी आवश्यक असणारे परवाने, ठेकेदाराचे परवाने याचा तपास सुरू आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया व जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सोमवारी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली असून तपासाबाबत सूचना केल्या आहेत. तसेच सोमवारी रात्री लाय डिटेक्ट पथक घटनास्थळी तपासासाठी दाखल झाले आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्याशी संपर्क साधला असता, पोलीस तपास सुरू असून कायदेशीर बाबी तपासून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.
जिलेटीच्या परवान्या बाबत मतभिन्नता
स्फोटानंतर घटनास्थळी बॉम्ब स्कॉड पथकाला जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. या जिलेटिनच्या परवान्याबाबत पोलीस व महसूल विभाग यांच्यात मतभिन्नता दिसत आहे. याबाबतची परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदारांना असल्याचे पोलिसांनी सांगितले तर याबाबत आमच्याकडे कोणतेही परवाने दिले जात नाहीत. तपासाचे काम पोलिसांचे आहे, असे तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी सांगितले.
पत्रकारांना वार्तांकन करण्यास रोखले
विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम हे घटनास्थळी भेट देणार आहेत. याची माहिती मिळताच वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना घटनास्थळी जाण्यापासून पोलिसांनी रोखले. यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.
बस्तवडे येथील जमीन सपाटीकरण आणि उत्खनन कामासाठी जमीन मालक संभाजी चव्हाण आणि ठेकेदार मोहन जंगम यांनी तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीही परवानगी घेतली नाही, गेले सहा महिने सपाटीकरण आणि उत्खननांचे काम सुरू आहे, असे पोलिसाच्या फिर्यादीत म्हटले आहे. तर जमीन उत्खननासाठी वापरण्यात येणार्या भुसुरूंगासाठी लागणारे जिलेटीन आणि डिटेनेटर याचीही परवानगी घेतली नसल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.