पुणे ः दरवर्षी अत्यंत उत्साहात आणि मोठ्या गर्दीत साजरा होणारा एक जानेवारीचा भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा यंदा घरातूनच...
पुणे ः दरवर्षी अत्यंत उत्साहात आणि मोठ्या गर्दीत साजरा होणारा एक जानेवारीचा भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा यंदा घरातूनच साजरा करा, असे आवाहन भीमा कोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आणि देशभरातील आंबेडकरी अनुयायांनी घरातूनच शौर्य दिन सोहळा साजरा करावा, असे आवाहन डंबाळे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. पुणे परिसरात तब्बल 14 हजार पेक्षा जास्त अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. शिवाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिसरातील सर्व प्रकारच्या गर्दीने साजर्या होणार्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्या आहेत. त्यामुळे जेजुरी येथील सोमवती अमावस्या आणि आळंदी येथील कार्तिकी यात्रा तसेच इतरही काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर भीमजयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाण दिन याप्रमाणेच आंबेडकरी अनुयायांनी कोरेगाव-भीमा लढ्यातील शूरवीरांना घरातूनच अभिवादन करून कोरेगाव भीमा येथे येण्याचे टाळावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनासोबत 10 ऑक्टोबर 29 डिसेंबरला बैठका घेतल्या. यावेळी जवळपास सर्वानुमते यंदाचा उत्सव हा केवळ अत्यंत मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डंबाळे यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी 1 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरेगाव भीमा येथे हे कोणत्याही सभांना जाहीर कार्यक्रमांना तसेच स्टॉलसाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.