लखनौ : उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात काय घडेल याचा नेम सांगता येत नाही. उत्तरप्रदेशातील धक्कादायक घटनांनी राजका...
लखनौ : उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात काय घडेल याचा नेम सांगता येत नाही. उत्तरप्रदेशातील धक्कादायक घटनांनी राजकारण ढवळून निघाले असताना, याच राज्यात पाकिस्थानी महिलेने सरपंचपद मिळविले आहे. या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे
उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यातील एका गावात खळबळजनक घटना घडली आहे. एक पाकिस्तानी महिला एटा जिल्ह्यातील एका गावची सरपंच बनली आहे, परंतु ती महिला सरपंच बनेपर्यंत कोणालाही याबाबतची कल्पना नव्हती. ही बाब एवढ्यापुरती मर्यादित नाही, कारण सरपंच बनण्यासाठी त्या महिलेने बनावट आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रदेखील बनवले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना मोठा झटका बसला आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे की, त्या महिलेला निवडणूक लढण्यासाठी बनावट कागदपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र कुठून मिळालं? मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात राहणारी 64 वर्षीय बानो बेगम 35 वर्षांपूर्वी एटा येथील एका गावात तिच्या नातेवाईकांकडे आली होती. त्यानंतर तिने तिथला तरुण अख्तर अली याच्याशी विवाह केला. तेव्हापासून ती भारतीय व्हिसा मिळवून भारतात राहात आहे. परंतु अद्याप तिला भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही. 2015 मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत बानो बेगमने अर्ज दाखल केला होता, ती निवडणूक बानो बेगमने जिंकली. त्यानंतर पाच वर्षांनी जानेवारीमध्ये गावच्या सरपंच शहनाज बेगम यांचं निधन झालं. त्यानंतर काहीच दिवसांत बानो बेगमने काही राजकीय समीकरणे जोडली आणि गाव समितीच्या शिफारशीनुसार बानो त्या गावची सरपंच झाली. पोलिसांनी याबाबत सांगितले की, बानो सातत्याने तिच्या व्हिसाचा कालावधी वाढवत इथेच राहात आहे. इथे राहता-राहता ती गावच्या सरपंचपदापर्यंत पोहोचली आहे.
महिलेविरोधात चौकशीचे आदेश
गावातील एक स्थानिक नागरिक कुवैदन खान यांना या महिलेबाबत संशय आला. त्यानंतर त्यांनी त्वरीत याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांत तक्रार दाखल होताच सदर महिलेने तिच्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा पंचायत राज अधिकारी आलोक प्रियदर्शी यांनी एटा जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांच्यासमोर हे प्रकरण सादर केले आहे. त्यांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.