लोणंद / वार्ताहर : खंडाळा तालुका बहुजन हक्क समितीच्या वतीने खंडाळ्यात घेण्यात आलेल्या बहुजन आरक्षण बचाव मोर्चाला हजारोंच्या संख्येने समस्त...
लोणंद / वार्ताहर : खंडाळा तालुका बहुजन हक्क समितीच्या वतीने खंडाळ्यात घेण्यात आलेल्या बहुजन आरक्षण बचाव मोर्चाला हजारोंच्या संख्येने समस्त बहुजन समाजाने हजेरी लावीत आपल्या हक्कांसाठी एल्गार केला. यावेळी बहुजन एकजुटीचा आवाज खंडाळ्यात घुमत असताना गजी नृत्य ढोल ताशांतच्या आवाजात तसेच सर्व जाती धर्माचे झेंडे हातात घेऊन एक क्रांतीचा जोश पाहायला मिळाला. खंडाळा एसटी स्टॅण्डपासून मोर्चास प्रारंभ झाला. मानवजातीसाठी झटणार्या महामानवांच्या नावाने विजयाचा जयघोष करत मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. बहुजन समाजाकडून ज्या मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्यांचे वाचन करण्यात आले. तसेच प्रशासनास या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विविध समाज घटकांतील उपस्थित असलेल्या समाजबांधव व भगिनींकडून मनोगते व्यक्त करताना आमच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
गेली एक महिना बहुजनांचे संघटन करण्यासाठी आरक्षण बचाव समितीकडून जनजागृती करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातून बहुजन समाज एकत्रित आला होता. बहुजन समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी हा बहुजन समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. अशी आक्रमक भूमिका ही घेण्यात आली आहे. गेली काही महिन्यांपूर्वी छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी जी आरक्षण संदर्भात जी भूमिका घेतली होती. त्या आरक्षणाच्या भूमिकेवरही सडकुन टीका करण्यात आली. तसेच उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने त्यांच्याबद्दल आदर असल्याचे ही म्हटले गेले. शाहू महाराजांना त्यांच्या राज्यात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेत आरक्षणाची तरतुदी करण्यासाठी खूप हालअपेष्टा सहन करावी लागली असल्याची प्रतिक्रिया ही यावेळी मनोगतातून व्यक्त करण्यात आल्या. आपल्या आरक्षणासाठी खंडाळ्यानंतर सातार्यातच नव्हे तर मंत्रालयावर मोर्चा काढावा लागेल. प्रस्थापितांकडून संविधानाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात असून संविधान वाचले पाहिजे यासाठी संघर्ष केला पाहिजे.
खंडाळा तालुक्यात अनेक कंपन्या निर्माण झाल्या आहेत. या कंपन्या उभ्या करण्यासाठी अठरा पगड जातीतील समाज बांधवांच्या जमिनी देण्यात आल्या आहेत. बहुजनांची पोरं कंपनीत घेतली जात नसून इथे जात पाहिली जाते आहे. आरक्षण या मुद्द्यांसह खंडाळा तालुक्यातील बहुजन समाज बांधवांच्या प्रश्नावर सडेतोडपणे मते व्यक्त करण्यात आली. कोणाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण आमच्या आरक्षणाला धक्का नाही, अरे ओबीसी झोपलात काय, जाती जातीत वाटलास काय, पुन्हा उठणार, पुन्हा पेटणार, एकच मिशन, ओबीसी आरक्षण आदी घोषवाक्य लिहिलेली फलक या मोर्चात झळकत होते. यावेळी रमेश धायगुडे, राजेंद्र नेवसे, प्रदीप माने, रामदास कांबळे, प्रदीप क्षीरसागर, ऍड. बाळासाहेब बागवान, आनंदराव शेळके-पाटील, चंद्रकांत खंडाईत यांच्यासह समस्त बहुजन समाजातील सामाज बांधव उपस्थित होते. या मोर्चास फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
बहुजन समाजाने मराठा समाजाला पाठींबा दिला पण....
मराठा समाजाचे मोर्चे निघाले त्यांना आरक्षण मिळावे म्हणून बहुजन समाजाने त्यांना पाठींबा दिला. मराठा समाजाकडे मोठा भाऊ म्हणून बघितले जाते. पण आजच्या बहुजन आरक्षण मोर्चासाठी आपल्याला पाठींबा मिळाला नाही. अशी खदखद ही यावेळी मोर्चेकर्यांनी व्यक्त केली. प्रस्थापित राजकारण्यांनी जसा मराठा क्रांती मोर्चांना पाठींबा दिला तसाच पाठींबा बहुजन आरक्षण बचाव मोर्चास द्यायला हवा होता. राजकारणाच्या वेळीच आपल्या मताची गरज या प्रस्थापित लोकांना हवी असते. बहुजन समाजाने राज्यकर्त्यांना मताच्या पेटीतून आपली ताकत दाखवा.
घटना भिमाची पाहुनी....
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचविण्यासाठी बहुजन समाजाने एकत्र राहून संघर्ष केला पाहिजे. नाहीतर शंभर वर्षापूर्वीचे दिवस परत यायला वेळ लागणार नाही, असे मते व्यक्त होत असताना शेवटी यावेळी घटनेचे महत्व गाण्याच्या माध्यमातून सांगण्यात आले. कुणी बी येऊ द्या निवडून जाऊ द्या राज्य करावं लागेल ओ घटना भीमाची पाहूनी हे गाणे सादर करण्यात आल्याने राजकीय पक्षांना आपल्याला मिळालेली सत्तेची जाणीव ही करून दिली.