मुंबई / प्रतिनिधी: राज्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसेचे अध्य...
मुंबई / प्रतिनिधी: राज्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याच्या सूचनाही राज यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मनसेही या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत येणार आहे.
आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत. त्यासाठी राज यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेले नाही; मात्र स्थानिक नेतृत्व परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असे मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितले. मनसे हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसेची ताकद अधोरेखित होईल, असेही ते म्हणाले; मात्र राज हे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार करणार, की नाही हे अद्याप ठरलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेची मते खाण्यासाठी मैदानात
दरम्यान, मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. शिवसेनेच्या व्होटबँकेला छेद देण्यासाठी मनसे मैदानात उतरत असल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या काही मतांनी विजय होत असतो. मनसेने प्रत्येक मतदारसंघात शे दोनशे मते घेतली, तरी त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसून भाजपला फायदा होऊ शकतो, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.