‘उभारी’मुळे चिंचोली येथील मुलीला मिळाली नवी दिशा शशिकांत भालेकर/पारनेर ः शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासकीय लाभ मिळवून देण्य...
‘उभारी’मुळे चिंचोली येथील मुलीला मिळाली नवी दिशा
शशिकांत भालेकर/पारनेर ः शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी उभारी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी सीए बनणार आहे.
काही दिवसांपूर्वीच तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने काही महिन्यापूर्वी भेट दिली होती. त्यावेळी त्या शेतकर्याच्या मुलीचे अपुरे राहिलेले सीए बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत या मुलीने एमकॉम परीक्षेमध्ये पारनेर कॉलेजमधून 81 टक्के मार्क मिळून पहिली आली आहे. उभारी मोहिमेंतर्गत पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबातील सदस्यांची उभारी मोहिमेच्या पथकाने चौकशी केली. शेतकर्याची पत्नी रोजंदारीवर कामाला जात होती. वडिलांच्या निधनानंतर शुभांगी झंझाड ही मुलगी शिक्षण घेत होती. मात्र तेही अडखळले होते. एका मुलीचे लग्न होऊन ती सासरी गेली होती. शासनाच्या उभारी मोहिमेमुळे तहसीलदार ज्योती देवरे या थेट कुटुंबाच्या घरी गेल्या. मुलीला व कुटुंबाला काही अडचणी असतील का याबाबत विचारणा केली. त्यावेळी शुभांगी झंझाड हिने आपल्याला सीए बनायचे आहे असे सांगितले. त्यानुसार तहसीलदार यांनी त्वरित आपण त्यासाठी मदत करू पाठपुरावा करू. तू तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कर असे सांगितले होते. त्या दृष्टीने त्या मुलीने अभ्यासाला सुरुवात केली. व बीकॉमच्या अखेरच्या वर्षीच्या परीक्षेत पारनेर कॉलेजमध्ये 81 टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच पुढील शिक्षणासाठी पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठीही तिला येणारा खर्च सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. अनेक आत्महत्या केलेल्या शेतकर्यांची कुटुंबे तसेच त्यांची मुले भोगतात. त्यांच्या पित्याचे छत्र हरपते, त्या वेळेपासून त्या कुटुंबाच्या मरणयातना सुरू यासाठी उभारी ही योजना काम करणार आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर अपुरे राहिलेले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभारी मोहिमेची या मुलीला मदत होणार आहे तिच्या प्रयत्नाला प्रशासनाचा व सेवाभावी संस्थेचा पाठिंबा मिळाला आहे.
तहसीलदार यांनी आपणाला सीए बनण्यासाठी मेहनत कर मी त्यासाठी पाठपुरावा व प्रयत्न करील असे सांगितले. त्यानुसार पुण्यातील एका क्लासमध्ये ऍडमिशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र कोविड मुळे ते बंद आहे. सुरू होताच तेथे सीएसाठी ऍडमिशन घेणार आहे. उभारी मोहिमेंतर्गत तहसीलदार यांच्या भेटीनंतर शिक्षण घेण्यासाठी मनोधर्य वाढले आहे. सीए बनण्याची वडिलांची इच्छा पूर्ण होणार की नाही हा प्रश्न होता मात्र या पाठिंब्यामुळे ते पूर्ण होण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणार आहे.
शुभांगी झंझाड