कोल्हापूर / प्रतिनिधी : महाराष्ट्रात महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारांमुळे भगिनींच्या सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळावा, या मागणीचे...
कोल्हापूर / प्रतिनिधी : महाराष्ट्रात महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारांमुळे भगिनींच्या सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळावा, या मागणीचे निवेदन आज वंचित बहुजन आघडीतर्फे जिल्हाधिकारी यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, राज्यात महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. खरेच महिला सुरक्षित आहेत का? महिलांवरील अत्याचार कमी होत आहेत का? काही ठिकाणी महिलांना तक्रार नोंदविण्यापासून न्याय मिळेपर्यंत संघर्ष करावा लागतो. अनेक ठिकाणी महिलांना अपमानास्पद वागणूक मिळते. आमच्या महिला, भगिनींना सतत भीतीच्या छायेखालीच वावरायचे का? अनेक ठिकाणी महिलांच्यावर अन्याय अत्याचार्यांच्या घटनामध्ये पोलिसांकडे तक्रार करुन महिलांना न्याय मिळेल असे नाही. महाराष्ट्र शासनाने महिलांनी सक्षम राहावे, असे वाटत असेल तर रितसर शस्त्र बाळगण्यास परवानगी द्यावी लागेल.
यासाठी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातर्फे आमच्या माता, भगीनींना बंदुकीचे परवाना द्या, अशी मागणी करत आहोत. महिला अत्याचारांच्या तक्रारीवर कठोरपणे कारवाई करावी. महिलांना बळकट करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा’ केल्याचे समजते. परंतू या कायद्यान्वये महाराष्ट्रात किती महिलांना न्याय मिळाला आणि महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी किती कठोर पावले उचलण्यात आली. याची चिंता सतत समाजासमोर असते. यावेळी विमल पोखर्णीकर, भारती शिंदे, मनिषा करणे शहराध्यक्ष संजय गुदगे, डॉ. आनंद गुरव, प्रभाकर माने, भारत कोकाटे, संभाजी कागलकर, पुष्पा कांबळे, बाळासाहेब कांबळे, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.