मुंबई / प्रतिनिधीः भाजपच्या नेत्यांच्या किंवा धोरणांच्या विरोधात जो कोणी बोलेल, त्यांच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावायची. सीबीआयबाबत तर आ...
मुंबई / प्रतिनिधीः भाजपच्या नेत्यांच्या किंवा धोरणांच्या विरोधात जो कोणी बोलेल, त्यांच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावायची. सीबीआयबाबत तर आम्ही निर्णय घेतला आहे. आमच्या परवानगी व्यतिरिक्त राज्यात सीबीआय चौकशी होऊ शकत नाही; मात्र ईडीचा जो अधिकार आहे, त्यांचा अधिकार व त्याचा राजकारणासाठी वापर करणे हे महाराष्ट्रात कधीही पाहिले गेले नाही, अशी टीका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
केंद्र सरकारविरुद्ध बोलणार्यांना ईडीकडून नोटीस देण्यात येते, हे आता जनतेला समजले आहे. जाणीवपूर्वक त्रास देण्याचे हे धोरण आहे. मला खात्री आहे, की, त्यामध्ये काही निष्पन्न होणार नाही. केंद्र सरकारविरुद्ध बोलणार्यांना बदनाम करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते, असा सणसणीत टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. भाजपचे काही मध्यस्थ आहेत, जे मला वारंवार भेटले आहेत. मागच्या वर्षभरात त्यांनी मला हे सरकार पाडण्यासंदर्भात धमकावले आहे. हे सरकार आम्हाला पाडायचे आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका असे सांगितले जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.