पुणे / प्रतिनिधीः मनसेच्या कार्यकर्त्यांना राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज ठाकरे स्वत:ही सक्र...
पुणे / प्रतिनिधीः मनसेच्या कार्यकर्त्यांना राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज ठाकरे स्वत:ही सक्रिय झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी राज पुण्यात दाखल होत आहेत. या वेळी ते जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती निश्चित करणार असल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार राज दोन दिवस पुण्यात मुक्काम करणार आहेत. मनसेकडून पुण्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तालुका पातळीवर मनसे नेत्यांच्या आढावा बैठका सुरू आहेत. आतापर्यंत इंदापूर, दौंड, मुळशी, शिरूर तालुक्यातील मनसेच्या पदाधिकार्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. या सगळ्याचा अहवाल आता राज यांच्यासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनसेकडून ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती निश्चित केली जाईल.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेला फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे निवडणूक लढवल्याने महाविकास आघाडीला फायदा झाला होता. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होणार का, हे पाहावे लागेल. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे ‘मनसे’कडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. जिकडे पॅनलमध्ये संधी मिळणार नाही, तिकडे मनसे स्वतःचा पॅनल तयार करेल. येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
----------------