अहमदनगर / प्रतिनिधीः यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याचे नवनवे प्रताप समोर येत असून आता पोलिसांनी ...

अहमदनगर / प्रतिनिधीः यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याचे नवनवे प्रताप समोर येत असून आता पोलिसांनी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
नोकरी घालविण्याची भीती दाखवून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आणि ती न दिल्याने वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करून आपली बदनामी केली, अशी फिर्याद एका महिलेने दिली आहे. यामध्ये बोठेसह वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दहिफळे याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल किसन हजारे-भुजबळ (वय 38, रा. सागर कॉम्पलेक्स स्टेशन रोड, आगरकर मळा, अहमदनगर) यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. 10 जुलै 2019 ते 12 डिसेंबर 2020 या काळात हा गुन्हा घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध संगमनत करून खंडणी मागितल्याचा आणि बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आपण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात क्षयरोग केंद्रात वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत होतो. दहा जुलै 2019 रोजी बाळ बोठे याने माहितीच्या अधिकार कायद्याखाली अर्ज करून वैयक्तिक माहिती मागविली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी या विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार केला असे निवेदन यशस्विनी महिला ब्रिगेडतर्फे या कार्यालयात देण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात स्मिता अष्टेकर यांनी आणखी असेच निवेदन दिले. या निवदेनांच्या बातम्या फक्त बोठे कार्यकारी संपादक असलेल्या वृत्तपत्रातच येत होत्या. त्यावर आपण पत्रकार परिषद घेऊन या बातम्या कशा चुकीच्या आहेत, हे पुराव्यानिशी दाखवून दिले होते. त्यानंतर दोन दिवसांनी बोठे याने मला चर्चा करण्यासाठी बोलाविले. तेव्हा आम्ही माझ्या कार्यालयाच्या बाहेर सिव्हिल हॉस्पिटल कंपाऊंडजवळ भेटलो.
बोठे म्हणाला, की तुमच्या कार्यालयातील अधिकारी डॉ. भागवत दहिफळे माझे चांगले मित्र असून ते मला सर्व गोपनीय माहिती पुरवितात. त्यानुसार बरीच माहिती मला प्राप्त झाली आहे. तुम्ही कार्यालयाची परवानगी न घेता महापालिकेची निवडणूक लढविली आहे. ही महत्वाची माहिती माझ्या हाती लागली आहे. जर यातून सहीसलामत बाहेर पडायचे असेल, तर मला दहा लाख रुपये द्यावे लागतील. आपण हे शक्य नसल्याचे त्याला सांगितले. त्यावर त्याने तुमची नोकरी नक्कीच जाणार, असे मला सांगितले. त्यानंतर बोठे याने आमच्या कार्यालयातील डॉ. दहिफळे याला हाताशी धरून, आपल्या पदाचा गैरवापर करून, वरिष्ठांवर दबाव आणून मला कंत्राटी नोकरीतून बडतर्फ करण्यास भाग पाडले.
----