नेवासा : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास समितीचे महासचिव चंपतराय यांनी कार्तिक वद्य एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी नेवासा...
नेवासा : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास समितीचे महासचिव चंपतराय यांनी कार्तिक वद्य एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे सदिच्छा भेट दिली. देवगडच्या धर्तीवर अयोध्येत गोशाळा व भक्तनिवास उभारणार असल्याचा मानस महासचिव चंपतराय यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
या भेटीप्रसंगी देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी त्यांचे स्वागत केले.सर्वप्रथम भगवान दत्तात्रयांचे दर्शन झाल्यानंतर चंपतराय यांनी पंचमुखी सिद्धेश्वर,श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. या स्थानाची व श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या तपोभूमी, देवगडची गोशाळा, भक्तनिवास या विषयी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी माहिती दिली. प्रवरा नदीच्या पवित्र तीर्थावर जाऊन त्यांनी यावेळी पहाणी केली. प्रवरानदीच्या तटावरील निसर्गरम्य घाट पाहून प्रसन्न मुद्रेने त्यांनी या पवित्र क्षेत्राचे दर्शन घेण्याचे मला भाग्य लाभले, मी धन्य झालो असे गौरवोदगार काढले. अयोध्येत होणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हिंदूचेच नसून समस्त राष्ट्राचे राष्ट्र मंदिर असेल असे ही त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले. प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माण कार्यात सर्वांचा सहभाग हा असला पाहिजे त्यासाठी 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत मंदिर निर्माण व्यापक निधी अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगून त्यासाठी सर्वांनी यथाशक्ती योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. स्वराज्याची स्थापना करतांना जसे छत्रपती शिवरायांना श्री समर्थ रामदास स्वामींनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे कठीण परिस्थितीत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी इतरांचा विरोध पत्कारून त्यावेळेस आम्हाला साथ दिली व कारसेवेत सहभागी झाले म्हणूनच आज आपण शिलान्यासाचा दिवस पहात आहोत. गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे अयोध्येच्या आंदोलनात योगदान मोलाचे असल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी बोलतांना काढले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष आप्पा बारगजे यांनी यावेळी श्रीराम मंदिर न्यासासाठी 21 लाखाची देणगी देण्याची घोषणा याप्रसंगी केली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विभागीय अध्यक्ष अॅड. सुनील चावरे, सरपंच अजय साबळे, महेंद्र फलटणे, चांगदेव साबळे, संदीप साबळे, मनोज पवार, विश्वनाथ नाणेकर, संतोष काळे सर उपस्थित होते.